पिंगोरी ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:38+5:302021-01-15T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : पुरंदर तालुक्यातील पिंगोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत सर्वांनी अर्ज मागे घेतले होते. जोपर्यंत पिंगोरी गावाचा रस्ता दुरुस्त होत नाही आणि गावात मोबाईल टॉवर उभा केला जात नाही, तोपर्यंत येथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून आज पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लवकरच ही कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.
पिंगोरी ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यानंतर, मंगळवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित मंजूर कामाचे निविदा करण्यात येईल आणि पिंगोरीकरांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी पिंगोरी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे, प्रकाश शिंदे, निलेश शिंदे, धनंजय शिंदे, सतीश खोमणे, हनुमंत कांबळे, माऊली यादव, सचिन शिंदे, तेजस शिंदे, मंगेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.
बाबासाहेब शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी साकुर्डे, पिंगोरी, वाल्हा या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र, राजकीय हेव्या दाव्यापोटी हे काम थांबवून ठेवण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या आणि खासगी जागेतून जात असलेल्या या रस्त्यासाठी तत्कालीन लोकांनी आवश्यकता नसताना वनविभागाची सुद्धा परवानगी घेण्यास सांगुन सुद्धा वेळ घालवला. अर्थात, यासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज नव्हती. मात्र, काम डवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर लोकांमध्ये आता चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पद्धतीने केली जाईल.
कोट
पिंगोरीकरांना झालेल्या त्रासामुळे त्यांनी बहिष्कारासारखा निर्णय घेतला. खरंतर हा रस्ता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तयार होणे अपेक्षित होते, मात्र हा झाला नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर संबंधित रस्त्याच्या इस्टीमेंट तयार करून ते निविदा प्रक्रियेत गेले आहे. मात्र, कोरोना आल्याने ही निविदा होऊ शकली नाही. सध्या तालुक्यामध्ये निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने यावर बोलले योग्य होणार नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- संजय जगताप, आमदार