दिवाळीत गुलाबी थंडी अन् धुकेही, शनिवारनंतर राज्यातील हवामान होणार कोरडे
By नितीन चौधरी | Published: November 8, 2023 08:29 PM2023-11-08T20:29:37+5:302023-11-08T20:30:34+5:30
आताच्या पावसामुळे तुमच्या दिवाळी सणाच्या आनंदावर पाणी फिरण्याची अजिबात शक्यता नाही
पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत असला तरी चिंता करू नका, या पावसामुळे तुमच्या दिवाळी सणाच्या आनंदावर पाणी फिरण्याची अजिबात शक्यता नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (दि. १०) कोकण व दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर (दि. ११) मात्र राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीत गुलाबी थंडी व धुक्याचा अनुभवही घेता येणार आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बुधवारी (दि. ८) दक्षिण कोकणात अर्थात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत हलका ते मध्यम ते स्वरूपाचा पाऊस झाला. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच पुण्याच्या काही भागातही हलका स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, अरबी समुद्रातील हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू निवळत असून शनिवारनंतर (दि. ११) राज्यातील हवामान पूर्णपणे निरभ्र होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
शुक्रवारपर्यंत पाऊस
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दक्षिण कोकणातील जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व नगर जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल.”
गुलाबी थंडी अन् धुके
कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर शनिवारनंतर राज्यात हवामान पूर्णपणे कोरडे होणार असून किमान तापमानात दोन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पहाटे धुके पडण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली. पुणे शहरातही गुरुवारी हलका ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून सायंकाळी ढगाळ वातावरण राहील. शुक्रवारी दुपारनंतर वातावरण निरभ्र होऊन किमान तापमानात घट होण्याचा अंदाज असल्याचे काश्यपी यांनी सांगितले.