लॉकडाऊननंतर गुलाबी ‘पुण्यदशम’ बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:44+5:302021-05-21T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ‘पुण्यदशम’ या गुलाबी रंगाच्या ५० मिडी बस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ‘पुण्यदशम’ या गुलाबी रंगाच्या ५० मिडी बस दाखल झाल्या असून, याद्वारे आता पुणेकरांना शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर दहा रुपयांमध्ये संचार करता येणार आहे़
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून घोषणा करण्यात आल्याप्रमाणे, नव्या ३५० मिडी बसपैकी सीएनजीवरील या ५० मिडी बस पीएमपीएमएलच्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत. दहा रुपयांत शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या योजनेचा शुभारंभ लॉकडाऊननंतर केला जाणार आहे. सदर बस खरेदीसाठी महापालिकेला १५ कोटी रुपये खर्च आला असून, आणखी ३०० बस खरेदीसाठी अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध आहे.
सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये जास्त प्रवास करता यावा या दृष्टीने पहिल्या टप्प्यात ‘पुण्यदशम्’ बसेस शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच झोन एकमध्ये कार्यरत राहणार आहेत. भविष्यात शहरात अन्य पाच झोनची आखणी करून प्रत्येक ठिकाणी ही दहा रुपयांमध्ये दिवसभर प्रवास ही सेवा देण्यात येणार आहे. देशात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग पुण्यात राबविण्यात येत असून, त्याचा पुणेकरांना मोठा लाभ होईल, असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.
--------------------------
फोटो मेल केला आहे़