Video: पुण्याच्या सेव्हन लव्ह्ज चौकात पाईपलाईन फुटली; तब्बल ३ तास रस्त्यावर पाण्याचा प्रवाह सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:44 PM2022-03-10T13:44:39+5:302022-03-10T13:46:26+5:30
पुणे शहरातील अनेक भागात नवीन पाईपलाईन बसवणे, खड्डे बुजवणे, डांबरीकरण अशी डागडुचीची कामे सुरु
पुणे : पुणे शहरातील अनेक भागात नवीन पाईपलाईन बसवणे, खड्डे बुजवणे, डांबरीकरण अशी डागडुचीची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीही होऊ लागली आहे. काम पूर्ण झाले तरी रस्ते पुन्हा दुरुस्त केले जात नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच स्वारगेट भागातील सेव्हन लव्ह्ज चौकात पाईपलाईन बसवण्याचे काम सुरु होते. आज सकाळी त्याठिकाणी अचानक पाण्याचा पाईप फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. तब्बल तीन तास पाण्याचा प्रवाह या रस्त्यावरून वाहत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
पुण्यातील स्वारगेट हा मुख्य चौक आहे. याचौकात चारही बाजूने वाहने येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्या चौकातून डाव्या बाजूला गेल्यावर सेव्हन लव्ह्ज चौक येतो. इतर वेळी सुद्धा या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसून येते. सायंकाळच्या वेळेत तर अनेकदा ट्रॅफिकही होते. त्यामध्ये याठिकाणी पाईपलाईन बसवण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला खोदून ठेवले आहे. तर सर्व माती, दगड रस्त्यावर तशीच टाकण्यात आली आहे. आज सकाळी काही कारणाने खोदून ठेवलेल्या ठिकाणी पाईपलाईन फुटली. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले होते. तब्बल तीन तास पाण्याचा प्रवाह थांबला नसल्याचे येथील अतुल जैन या नागरिकाने लोकमतशी बोलताना सांगितले.
पुण्याच्या सेव्हन लव्हज चौकात पाईपलाईन फुटल्याने ३ तास पाण्याचा प्रवाह सुरू#Pune#waterpic.twitter.com/bgJD8RJ9ii
— Lokmat (@lokmat) March 10, 2022
गेल्या १५ दिवसापासून हे काम सुरु आहे. ते पूर्ण झाले आहे. पण खोदून ठेवलेले रस्ते पुन्हा दुरुस्त केले नाहीत. हा वर्दळीचा भाग असल्याने येथे आधीच वाहने जास्त येतात. त्यातून महापलिककेने असं खोदून ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. आज सकाळी पाण्याचा पाईप फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले होते. अनेक दुचाकींचे छोटे अपघातही झाले. आता पाण्याचा प्रवाह थांबला आहे. पण खड्डे बुजवून लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करावे अशी नागरिकांची मागणी असल्याचे अतुल जैन यांनी सांगितले आहे.