पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली; नऊ जण जखमी; ४० घरांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 12:46 PM2020-10-17T12:46:57+5:302020-10-17T12:50:36+5:30
अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले..
गौरव कदम पुणे : पर्वतीजवळील जनता वसाहतीत शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता पाण्याची तब्बल १८ इंची पाईपलाईन फुटून पूर आला. यामध्ये ३० ते ४० घरांमध्ये पाणी घुसून येथील रहिवासी पन्नास ते साठ फूट वाहत गेले. त्यामुळे नऊ जण जखमी झाले आहेत.
जनता वसाहत गल्ली क्रमांक २९ मध्ये हा भीषण प्रकार घडला. ही वसाहत डोंगरउतारावर वसलेली आहे. या भागातून पुण्याला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइॅन गेलेली आहे. पर्वतीच्या टेकडीवरून येणारे पाणी असल्याने त्याला खूप प्रेशर होते. त्यामुळे अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत.महेश मोरे, रविंद्र कोंढाळकर, सुनीता बाईत, पीयूष जाधव , अक्षय सोलकर हे यामध्ये जखमी झाले आहेत. त्यानां ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.इतर जखमींना भारती विद्यापीठ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या पर्वतीवर बांधण्यात आल्या आहेत. त्याला पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून सप्लाय होतो. त्या टाक्या अगोदर भरल्या जातात आणि त्यातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. डोंगरावरून पाणी येत असल्याने पाण्याला प्रेशर येते. या प्रेशरने पाणी उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोघा जणांचे हाडा मध्ये फ्रॅक्चर झाले आहे अशी माहिती जनता वसाहत मधील सामाजिक कार्यकर्ते सूरज लोखंडे यांनी दिली
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जनता वसाहतीमध्ये अनेक गल्या आहेत. या गल्यांमध्ये प्रेशरने पाणी घुसल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान गल्ली नंबर २९ मधील घरांचे झाले. या घरांमध्ये इतक्या वेगाने पाणी घुसले की घरातील अनेक जण पाण्याबरोबर वाहत गेले. आदळले गेल्यामुळे त्यांना जखमा झाल्या आहेत.सूर्यकांत लोंढे यांचे घर या पाण्यामुळे पडले.
सुरूवातीला पाणी हळू येत होते. नंतर त्याचा वेग वाढला. रात्रीची वेळ असल्याने लोकांना काही समजले नाही. लोक घराच्या बाहेर आल्यावर त्यातील अनेक जण घसरून पाण्याबरोबर वाहत गेली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेले काहीजणही जखमी झाले.