Accident: पिरंगुट घाटात भीषण अपघात; ट्रकची ३ दुचाकीसह चारचाकीला धडक, एकाचा मृत्यू तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:29 PM2022-03-22T16:29:38+5:302022-03-22T16:30:01+5:30
पुणे कोलाड महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून रोडवेज कंपनीच्या नियोजन कामामुळे कालच भुगाव येथे साळुंके या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता
पौड : पुणे कोलाड महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून रोडवेज कंपनीच्या नियोजन कामामुळे कालच भुगाव येथे साळुंके या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज(ता.२२) पुन्हा एकदा आणखी एक बळी गेल्याची घटना पिरंगुट घाटात घडली आहे. या अपघातात राउतवाडी (लवळे) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी तसेच अन्य दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ९ ते १० च्या दरम्यान पुणेकडून पिरंगुटच्या दिशेने नव्यांगण सोसायटीजवळ घाटात अतिशय वेगाने येणारा ट्रकने चालकाचा ताबा सुटल्याने सुरुवातीला चार चाकीलामागून येऊन धडक दिली. सुदैवाने ही चारचाकी व त्यातील खुबवली येथील भायगुडे पती पत्नी व त्यांची छोटीशी नात वाचले. गाडीचे थोडेसे नुकसान वगळता सर्वजण सुखरूप आहेत. त्यानंतर पिरंगुट घाट संपतो व नवीन रस्ताही संपतो. त्याठिकाणी या बेधुंद ट्रकने समोरून येणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीला टक्कर दिली. त्यात त्या दुचाकीवर असलेले आतिष वाघमारे, आकाश कांबळे व तुषार आडसूळ हे जखमी झाले. यातील एकजण लहान मूल असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे.
तसेच त्यांच्या मागेच होंडा दुचाकीवर असलेले रिहे येथील प्रशांत शिंदे यांची दुचाकीही सदर ट्रक खाली आली. परंतु शिंदे बाजूला फेकले गेल्याने सुदैवाने वाचले.त्यानंतर या ट्रक चालकाचा पूर्ण ताबा सुटल्याने व त्याने अर्जंट ब्रेक लावल्याने हा ट्रक समोर जाऊन पलटी झाला. या ट्रकचा जोराचा धक्का समोर या दुचाकीवरून जाणारे बोरूळे शिक्षक दाम्पत्याला लागला. यात पलेजर गाडीचा चक्काचूर झाला तसेच बोरूळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना व त्यांच्या पत्नीला दीनानाथ रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने संजय बोरूळे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पत्नी या जखमी असून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य तीन जखमींना सिम्बयोसिस येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली.