उस्मानाबाद येथील मराठी साहित्य संमेलनात पायरेटेड पुस्तके आढळल्याने उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:55 PM2020-01-10T13:55:16+5:302020-01-10T13:58:01+5:30
साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर आढळली पायरेटेड पुस्तके
उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होण्या अगोदरच येण्या त्या प्रकाराने गाजत आहे. कधी साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरुन तर कधी संमेलन उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक ना.धो.महानोर यांना कार्यक्रमाला न जाण्याची आलेली धमकी. सातत्याने अशा घटनांनी उस्मानाबाद येथील साहित्य संमेलन चर्चेत आहे. त्यात भर म्हणून शुक्रवारी साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हिंगलासपूरकर नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले असता, कचोरीच्या स्टॉलच्या बाजूला पायरेटेड पुस्तकांची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते म्हणाले, 'अजून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झालेले नाही. त्याआधीच कचोरी आणि वडा पावच्या स्टॉलच्या बाजूला 'आमचा बाप आणि आम्ही' आणि 'कोल्हाट्याचे पोर' ही पायरेटेड पुस्तके आढळून आली. याबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके येथे उपलब्ध होती. 'कोल्हाट्याचे पोर'ची छापील किंमत 125 रुपये आहे. मात्र, पायरेटेड पुस्तक 150 रुपयांना विकले जात होते. 'आमचा बाप आणि आम्ही' ही छापील किंमत 150 रुपये असून, पायरेटेड पुस्तकावर २५० रुपये किंमत टाकण्यात आली आहे.'
हा चोरीचा प्रकार असून, मराठवाड्यात पायरेटेड पुस्तकांचा व्यवहार करणारे ८ विक्रेते आहेत. अनेक जुन्या पुस्तकांना वाचकांकडून आजही चांगली मागणी आहे. 'बलुतं' या पुस्तकाला 40 वषार्नंतरही मागणी आहे. याचा फायदा घेऊन हे पायरसीचे प्रकार घडत आहेत. संमेलनातच असे प्रकार होणे पूर्ण चुकीचे आहे. आम्ही प्रकाशक संमेलनात आधीच पुस्तकांवर सवलत जाहीर करत असतो. गैरव्यवहार करणारे विक्रेते जास्त किंमत लावून वाचकांची फसवणूक करत आहेत. पायरसी हा गुन्हा आहे. सरकारने कडक कायदा करून बंदी आणावी. कारण, अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे घातक आहे. आम्ही संयोजकांकडे तक्रार केली आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ही पुस्तके मी रद्दीतून विकत घेतली, असे विक्रेत्याने सांगितले. मात्र, अशी नवीकोरी पुस्तके रद्दीत कशी विकली जातील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संयोजकांकडे तक्रार केल्यानंतर पुस्तके जप्त करून संबंधित विक्रेत्यास बाहेर काढण्यात आले.