पिस्तुल बाळगणा-या सराइतास कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:13 AM2017-08-04T03:13:11+5:302017-08-04T03:13:13+5:30
बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका सराइतास फरासखाना ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पुणे : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका सराइतास फरासखाना ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याच्या ताब्यातून एक पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
उबेद सलीम शेख (वय २४, रा. ११६० कसबा पेठ) असे कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमेय रसाळ यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली. उबेद शेख कसबा पेठेतील पीएमसी कॉलनी येथे आला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल व दोन पितळी धातूची जिवंत काडतुसे असा एकूण २० हजार १०० रुपयांचा ऐवज आढळून आला.
उबेद शेख याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असून, तो सराईत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली.