पोलिसांवर पिस्तूल रोखून पळणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 09:13 PM2018-07-31T21:13:23+5:302018-07-31T21:17:23+5:30
त्याने कमरेचे पिस्तुल काढून पोलिसांवर रोखले व मी भाई आहे इथला़ मला पकडणारा जन्माला यायचाय असे म्हणून कोणी पुढे य्याल तर मी फायर करीन....
पुणे : गावठी पिस्तुल बाळगणाऱ्याविषयी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला़. पण, त्या अगोदरच ते त्याच्या लक्षात आले़ तेव्हा त्याने पोलिसांवर पिस्तुल रोखून पुढे याल तर फायर करेन,अशी धमकी दिली़. ते पाहून भर चौकात एकच गोंधळ उडाला़. अनेक वाहनचालकांनी आपली वाहने जागेवरच सोडून पळ काढला़. शेवटी पोलिसांनी पाठलाग करुन त्याला जेरबंद केले़. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता सेव्हन लव्ह चौकात घडली़ .
आकाश कुमार शेटे (वय २०, रा़ शुक्रवार पेठ) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले़. खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी राकेश क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, पंढरपूरला वारीला गेलेला परत येत असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल आहे़. या माहितीवरुन पोलिसांनी लव्ह लव्हज चौकात रात्री सापळा रचला़ मिळालेल्या माहितीप्रमाणे एक जण हॉटेल चंदनसमोर येताच पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरुन पकडण्याचा प्रयत्न केला़. तेव्हा त्याने कमरेचे पिस्तुल काढून पोलिसांवर रोखले व मी भाई आहे इथला़ मला पकडणारा जन्माला यायचाय असे म्हणून कोणी पुढे य्याल तर मी फायर करीन असे सांगत तो चौकातून हातात पिस्तुल धरुन पळू लागला़. त्याला पाहून चौकातील काही जणांनी जागेवरच वाहने टाकून पळ काढला़. हातगाडीवाले हातगाडी सोडून पळून गेले़. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुुरु केला़. नेहरु रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र समोर शेवटी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले़.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी तसेच विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, कर्मचारी शाम लोहोमकर, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे यांनी ही कारवाई केली़.