हौसेसाठी ‘ तो ’ बाळगत होता पिस्तुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:55 PM2018-07-17T21:55:58+5:302018-07-17T22:00:07+5:30
घराशेजारी राहायला आलेल्या एका बिहारी तरुणाकडून त्याने सहा महिन्यांपूर्वी ते विकत घेतले होते़. केवळ हौस म्हणून तो ते मिरवत होता़.
पुणे : तो २५ वर्षाचा तरुण, शिक्षण अर्धवट सोडलेले, सध्या काहीही कामधंदा करत नाही, आईवडिल मोलमजुरी करणारे, त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नाही की कोणाची भांडण नाही़. लहानपणापासून पुण्यात राहणाऱ्या या युवकाच्या शेजारी एक बिहारी तरुण राहिला. त्याच्याकडील हत्यार पाहून त्याने ते विकत घेतले़ आणि आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला़. केवळ हौस म्हणून तो गेल्या सहा महिन्यांपासून गावठी पिस्तुल बाळगत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़.
अभिषेक दीपक दीक्षित (वय २५, रा़ जनता वसाहत, पर्वती) असे त्याचे नाव असून दत्तवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस नाईक सुधीर घोटकुले यांना पर्वती दर्शन येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील जय भवानी हॉटेलसमोर एक तरुण गावठी पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली़ . या माहितीनुसार दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले़. त्याकडे २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले़. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या घराशेजारी राहायला आलेल्या एका बिहारी तरुणाकडून त्याने सहा महिन्यांपूर्वी ते विकत घेतले होते़. केवळ हौस म्हणून तो ते मिरवत होता़. अभिषेक दीक्षित याच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे नसल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले़.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ तसेच पोलीस कर्मचारी तानाजी निकम, रवींद्र फुलपगारे, सुधीर घोटकुळे आदिंनी ही कामगिरी केली़.