भूर्जी देण्यास नकार देणाऱ्यावर राेखले पिस्तुल; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 02:38 PM2022-12-24T14:38:41+5:302022-12-24T14:39:42+5:30
अज्ञात आराेपीविराेधात स्वारगेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
पुणे : रात्री उशिरा अंडा राइस देण्यास नकार देणाऱ्या अंडाभूर्जीचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गल्ल्यातील अडीच हजारांची राेख रक्कम चाेरून नेली. ही घटना स्वारगेट बसस्थानकासमाेर घडली. याबाबत कुणाल प्रभाकर कांबळे (वय २७, कालवा रस्ता, स्वारगेट) याने फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आराेपीविराेधात स्वारगेट पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
फिर्यादी कुणाल हा स्वारगेट बसस्थानकाबाहेर पदपथावर त्याच्या दाजीच्या मालकीची अंडाभूर्जी हातगाडी चालविताे. बुधवारी रात्री उशिरा ताे हातगाडी बंद करून तेथून निघून जात असताना आराेपी तेथे आला. त्याने अंडा राइस तयार करून देण्यास सांगितले. मात्र, कुणाल याने त्याला नकार दिला. त्यामुळे आराेपीने त्याच्याजवळील पिस्तूल काढले आणि कुणाल याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करीत जबरदस्तीने अंडाभूर्जी हातगाडीतील गल्ल्यातील अडीच हजारांची रक्कम काढून घेत पसार झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच आराेपीविराेधात गुन्हा दाखल केला असून, स्वारगेट पाेलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.