Pune: खड्डा खाेदला रस्त्यासाठी, त्यात बुडाल्या चार मुली! कोंढव्यातील दुर्घटना, एकीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 06:02 PM2024-06-08T18:02:01+5:302024-06-08T18:05:44+5:30

कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात ठिक-ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खाेदण्यात आले आहेत....

Pit for the road, four girls drowned in it! Katraj Kondhwa road accident, one died on the spot | Pune: खड्डा खाेदला रस्त्यासाठी, त्यात बुडाल्या चार मुली! कोंढव्यातील दुर्घटना, एकीचा जागीच मृत्यू

Pune: खड्डा खाेदला रस्त्यासाठी, त्यात बुडाल्या चार मुली! कोंढव्यातील दुर्घटना, एकीचा जागीच मृत्यू

कोंढवा (पुणे) : कात्रज-कोंढवा रोडवर गगन उन्नती सोसायटी समोरील महाकाली मंदिराजवळ रुंदीकरणासाठी रस्ता खाेदण्यात आला हाेता. या वीस फूट खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आणि त्याचा अंदाज न आल्याने त्यात चार मुली बुडाल्या. ही दुर्घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली. यातील मुस्कान शिलावत (अंदाजे वय १६, मृत) या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिघींना वाचविण्यात यश आले आहे. यात मुलीचा नाहक बळी गेला असून, याला जबाबदार काेण? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात ठिक-ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खाेदण्यात आले आहेत. काही लोक तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या टाकून महाकाली मंदिराजवळ राहतात. दारोदारी जाऊन गोधडी शिवणे, घरातील अवजारांना धार लावणे अशी कामे करतात. हे लोक मंदिराशेजारी वास्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शेजारी असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात पाणी साचले हाेते. येथील झोपडीत राहणाऱ्या महिला व मुली कपडे धुण्यासाठी तेथे गेल्या असता चार जणी पाण्यात बुडाल्या. वेळीच मदत मिळाल्याने तिघांना जीवदान मिळाले, पण एकीचा बळी गेला आहे.

अधिक माहितीनुसार, मुस्कान शिलावत (अंदाजे वय १६, मृत), सरगम शिलावत (वय १५), सेजल शिलावत (वय १३), झानू शिलावत (वय १५) या चाैघी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या हाेत्या. पाय घसरून या मुली खड्ड्यात पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तत्काळ चारही मुलींना बाहेर काढले परंतु शेवटी उशिरा हाती आलेल्या मुलीला दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदरील घटनेची माहिती मिळताच अग्निशामक केंद्र पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

कात्रज कोंढवा रस्त्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून ४ मुली बुडाल्याची माहिती शनिवारी सकाळी घडली. टेम्पो चालक राम कुरवा, विठ्ठल घवाळे यांना ही बाब निदर्शनास पडताच तत्काळ मदतीसाठी धावून गेले. जीवाची परवा न करता केलेल्या मदतकार्यामुळे त्यातील तिघींनी वाचविले. एका 16 वर्षीय मुलीचा मात्र दुर्देवी मृत्यू झाला. आज या निष्पाप जिवाचा मृत्यू घेणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

- सुरेश उर्फ बाळा कवडे, स्थानिक

कात्रज कोंढवा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यात इस्कॉन चौक येथे भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. तेथे १५ ते २० फूट खड्डा खोदला असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यात पडून एका मुलीचा नाहक बळी गेला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

- संगीता ठोसर, माजी नगरसेविका, पुणे मनपा

कात्रज कोंढवा रोडवर खड्यात पडून एका मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. वेळीच मदत मिळाल्याने तीन मुली सुखरूप घरी आल्या आहेत. या हलगर्जीपणाबद्दल ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करावी.

- महादेव बाबर, माजी आमदार

Web Title: Pit for the road, four girls drowned in it! Katraj Kondhwa road accident, one died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.