पितृ पंधरवड्यामुळे गवार, कारली अन् भोपळा खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:09 AM2021-09-25T04:09:34+5:302021-09-25T04:09:34+5:30
भेंडी, टोमॅटोही कडाडला : फळभाज्यांमध्ये ४० टक्क्यांपर्यंत तेजी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या सुरु असलेल्या पितृ पंधरवड्यामुळे मार्केट ...
भेंडी, टोमॅटोही कडाडला : फळभाज्यांमध्ये ४० टक्क्यांपर्यंत तेजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या सुरु असलेल्या पितृ पंधरवड्यामुळे मार्केट यार्डमध्ये गवार, कारली, डांगर भोपळा यांना जास्त मागणी असून, भावही प्रचंड वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जवळजवळ सर्वच भाजीपाल्याला मागणी वाढल्यामुळे बऱ्याच फळभाज्यांचे भाव ४० टक्क्यापर्यंत वाढले आहेत.
पितृ पंधरवड्यात विशेषतः गवार, कारली, वांगी, डांगर भोपळा, वाटाणा, बीन्स घेवडा, टोमॅटो, फ्लाॅवर, वाल, सिमला आदींना चांगली मागणी असते. त्यामुळे बाजारभावावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसत आहे. या भाज्या खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डात ग्राहकांनी सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
------
चौकट
पितृ पंधरवड्यात लागणाऱ्या प्रमुख भाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे...
वाण बाजारातील दर घराजवळ
* गवार गावरान ५०-६० ८०-९०
* कारली २५-३० ४०-५०
* वांगी २५-३० ३५-४०
* डांगर भोपळा १०-१२ २०-२५
* वाटाणा ८०-९० १००-१२०
* बीन्स ३५-४० ४५-५०
* टोमॅटो १०-१५ ४०-५०
* फ्लाॅवर २२-२५ ३५-४५
* भेंडी २५-३० ४०-५०
* वाल ३०-३५ ४५-५०
* सिमला इंडस ३०-३५ ४०-४५
----
मागणी वाढली
पितृ पंधरवड्यात पालेभाज्या आणि भेंडी, गवार, भोपळ्याला विशेष करून मागणी असते. सध्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पाऊस सुरु असल्याने पालेभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे होलसेल बाजारातही दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.
-----
व्यापारी काय म्हणतात ?
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि दौंड तालुक्यातून विशेष करून भाजीपाला पुण्याच्या बाजारात येत असतो. सध्या जोराचा पाऊस सुरू असल्याने भाजीपाला खराब होत आहे. इतर जिल्ह्यांतून भाजीपाला मागवावा लागत आहे. डिझेलचेही दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
- पोपट झुरुंगे, भाजीपाला विक्रेता
----
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
पितृ पंधरवड्यात भाजीपाला लागतोच. आमच्यापासून मार्केट यार्ड जवळपास १०-१२ किलोमीटर लांब आहे. अर्धा-एक किलोसाठी एवढ्या लांब जाणे परवडत नाही. त्यामुळे दर जरी वाढले असले तरी आम्ही घराजवळच भाजीपाला खरेदी करतो.
- सुनीता कदम, गृहिणी