चाकण-तळेगाव महामार्गावर पडले खड्डे, वाहने चालवताना करावी लागते कसरत;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:59+5:302021-07-25T04:08:59+5:30
या रस्त्यावर वाहनचालक नागरिकांची आरडाओरड सुरु झाली की पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून किंवा ओबडधोबड काम करून तात्पुरती मलमपट्टी ...
या रस्त्यावर वाहनचालक नागरिकांची आरडाओरड सुरु झाली की पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून किंवा ओबडधोबड काम करून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. चौपदरीकरण करून नूतनीकरण होणे अपेक्षित आहे. परंतु ठिम्म प्रशासन आणि राजकीय नेते थातूरमातूर घोषणा करून, लोकांची दिशाभूल करत आहेत. आजपर्यंत या रस्त्यावर झालेल्या वाहनांच्या अपघातात मागील दहा वर्षांत वाहनचालक, प्रवासी, पादचारी तसेच नेत्यांची मुले व पोलीस अधिकाऱ्यांना मृत्यूने आमंत्रण दिले तर काही कायमचे जायबंदी झाले आहेत. तरीही प्रशासन व नेते जागे होईनात. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
चाकणच्या तळेगाव चौकाजवळ मोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून रस्त्याच्या कडेने तळे झाले आहे. यातून वाहन चालवताना पडलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आणि रिक्षाचे अपघात होत आहेत. या रस्त्याला रस्त्याला साइडपट्ट्याच राहिल्या नाहीत. साइडपट्ट्यांची गटारे झाली आहे. यातून वाहनचालक वाहने वेडीवाकडी चालवून खड्ड्यांमधूनच मार्ग काढावा लागतो. खराबवाडीपासून सुरू झालेली ही खड्ड्यांची मालिका चाकणपर्यंत कायम आहे. प्रत्येक वाहनचालकास खड्डे सुरु होण्यापूर्वी थांबावे लागते, विचार करावा लागतो आणि मग खड्डे चुकविण्याचे कौशल्य वापरावे लागते. कितीही सराईत चालक असला तरी त्याला एक किंवा दोन खड्डे चुकविण्यापलीकडे मजल मारता येत नाही. या रस्त्यावर वाहने चालविणे अक्षरशः अवघड झाले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी या महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली.
- चाकणच्या तळेगाव चौकाजवळ खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी.
240721\img-20210723-wa0034.jpg
फोटो