पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:15 AM2021-08-13T04:15:43+5:302021-08-13T04:15:43+5:30
वाल्हे : दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होण्याआधीच पालखी महामार्गाची डागडुजी केली जात होती. मात्र गेल्या ...
वाल्हे : दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होण्याआधीच पालखी महामार्गाची डागडुजी केली जात होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने आणि कोरोनाचे संकट सातत्याने असल्याने पालखी सोहळ्याची डागडुजी झाली नाही. त्यामुळे वाल्हेनजीक या पालखीमार्गावर खड्डेच खड्डे असल्याचे दिसत आहेत.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, दौंडज खिंड ते नीरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामधून काही वेळा अपघात घडले आहेत.
पालखी महामार्गाची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. त्या वेळी जानेवारीत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून फुरसुंगी पासून दिवे घाट, सासवड, जेजुरी येथील रस्त्यांची डागडुजी करून खड्डे बुजवले होते. रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यावर पिसुर्टी फाटा येथील कोल्हेखिंड ते दौंडज खिंड या अरुंद मार्गावरील खड्डे बुजविण्याचे तातडीने पूर्ण करण्यात आले होते. मात्र पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजीच्या साईडपट्टीचे काम मागील वर्षांपासून भरायचे राहूनच गेले आहे. पालखी महामार्गावरील खड्डे बुजवून अवघे तीन- साडेतीन महिने झाले असून, पुन्हा पालखी महामार्ग खड्डेमय झाला आहे.
----
कोट १
- पालखी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे २० दिवसांत महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात होईल.
- श्रुती नाईक (सहायक अभियंता श्रेणी १, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे.)
--
कोट २
पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावर डागडुजी करून फक्त तीन- साडेतीन महिने झाले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ खड्डे पडले आहेत. यामुळे संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले होते हे सिद्ध होते. ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच पालखी महामार्ग पुन्हा खड्डेमय झाला आहे. या निकृष्ट कामास संबंधित ठेकेदारास जबाबदार धरून या ठेकेदारवर गुन्हा दाखल करून, या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.
- नीलेश भुजबळ, माजी उपसरपंच दौंडज.