अधिकारी व ठेकेदारांमधील संगनमतामुळेच रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:21+5:302021-07-29T04:12:21+5:30
पुणे : रस्ते विकसित करताना रस्ता खराब झाल्यास संबंधित ठेकेदाराने पुन्हा पूर्ववत करावा यासाठी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड निश्चित केलेला ...
पुणे : रस्ते विकसित करताना रस्ता खराब झाल्यास संबंधित ठेकेदाराने पुन्हा पूर्ववत करावा यासाठी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड निश्चित केलेला असतो. असे असताना प्रशासनाकडून डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविणेचे काम केले जात असून, ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांमधील या संगनमतामुळेच शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे़
पुणे महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य न झाल्याने, तसेच रस्ते खोदाईनंतर रिईनस्टेटची कामे देखील अर्धवट व निकृष्ट केल्याने शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींचे टेंडर काढले असूनही आज शहर खड्डयात आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून पुणे शहर स्मार्ट झाले आहे अशा घोषणा केल्या जातात व प्रत्यक्षात मात्र शहर खड्डयात गेले आहे. त्यामुळे शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत व संबंधित अधिकारी यांनी रस्त्यांची कामे तांत्रिकदृष्टया न तपासल्याने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारवाई करण्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे़