हल्ला झाला त्यापूर्वी हैराण झालेला तरस- ज्येष्ठाला तरसाच्या तावडीतून सोडविणाऱ्याच्या भावना ; नर तरसासह चौघांचे होते कुटुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:06+5:302021-09-11T04:12:06+5:30
याविषयी खरपुडी खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे म्हणाले,‘मंदिराच्या परिसरात वन क्षेत्र आहे. माेर, तरस मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत ...
याविषयी खरपुडी खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे म्हणाले,‘मंदिराच्या परिसरात वन क्षेत्र आहे. माेर, तरस मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत येतात. काही दिवसांपूर्वी ज्या तरसाने नागरिकांवर हल्ला केला, ते एकटे नसून, त्याचे कुटुंब आहे. चौघाचे कुटुंब असून, हा नर होता. मादी व दोन पिल्लं आजुबाजूलाच राहतात. ज्या दिवशी तरसाने हल्ला केला, त्या दिवशी सकाळी काही जणांनी त्या तरसाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या तरसाला हुसकावले होते. त्यामुळे ते तरस बिथरले. म्हणून त्याने आक्रमक होऊन हल्ला केला. ज्यांच्यावर हल्ला झाला, ते देखील सांगतात की, त्यांना अनेकदा तरस दिसले आहेत. त्यांच्याजवळून ते जाते, पण कधीच चावा घेत नाही.’
—————————————-
खरपुडी खंडोबा मंदिराच्या परिसरात अनेक तरस दिसतात. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे एक प्रेक्षणीय स्थळ असून, अनेकजण त्याला भेट देतात. त्यामुळे तिथे काही तरुण आले होते. त्यांनी तरसाचे फोटो काढायचे प्रयत्न केले. त्या तरसाला आवाज दिले. तासभर ते त्या तरसाला त्रास देत होते. कदाचित त्यामुळेच तो घाबरला.
- राजेश गाडे, पुजारी, खरपुडी खंडोबा मंदिर
——————————————-
पंडित सुदाम गाडे यांच्यामुळे वाचले प्राण...
जेष्ठ नागरिक पांडुरंग जाधव यांच्या हाताला तरसाने पकडले, तेव्हा त्यांच्याकडे एक काठी होती. त्यांच्यासोबत पंडित सुदाम गाडे होते. त्यांनी लगेच काठी घेऊन त्या तरसाला मारले, तेव्हा ते पळून गेले. म्हणून पांडुरंग जाधव यांचे प्राण वाचले. परंतु, त्यांच्या हाताला जखम झाली असून, हाड मोडले आहे. कारण तरसाचा जबडा मोठा आणि त्याच्या चावण्याची क्षमता खूप असते. पांडुरंग जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
———————-
तरस दिसल्यास शांत उभे राहा...
मी गेली अनेक वर्षांपासून गुजरवाडी परिसरातील डोंगरात सकाळी फिरायला जातो. त्या ठिकाणी अनेकदा तरस दिसले आहेत. कधी एक तर कधी दोन दिसतात. माझ्या समोर आले तर मी फक्त शांत उभा राहतो. मग ते थोडा वेळ पाहतात आणि निघून जातात. आजपर्यंत कधी त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला नाही. तरस दिसले तर घाबरू नये, त्यांना पाठ दाखवू नये किंवा खाली बसू नये. कारण त्यांना असे केल्याने भीती वाटते आणि ते अंगावर येऊ शकतील.
- चेतन वैती, नागरिक, गुजरवाडी, कात्रज परिसर