‘पीके’ची एनएफएआयच्या खजिन्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:29+5:302021-07-07T04:13:29+5:30
पुणे : ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी राजकुमार हिरानी चित्रपटांमध्ये हलक्याफुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांची मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. श्रद्धेच्या नावाखाली ...
पुणे : ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी राजकुमार हिरानी चित्रपटांमध्ये हलक्याफुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांची मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडला गेलेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या परग्रहवासीयांच्या विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाची कहाणी म्हणजे ‘पीके’ हा चित्रपट.
हिरानी यांनी मंगळवारी (दि. ६) ‘पीके’ चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्हज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांनी यापूर्वी त्यांचे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई (२००६), आणि थ्री इडियट्स (२००९) हे तिन्ही चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाला दिले आहेत.
राजकुमार हिरानी यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचे आहे. हिरानी यांनीच लेखन, संपादन आणि दिग्दर्शन केलेला ’पीके’ चित्रपट म्हणजे भारतीय समाजातील राजकीय प्रहसनाचा उत्तम नमुना आहे. याशिवाय विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर सहनिर्मिती केलेला ‘पीके’ चित्रपट हा सेल्युलॉइडमध्ये चित्रित केलेल्या भारतातील शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक प्रमुख चित्रपट आहे.
या वेळी राजकुमार हिरानी म्हणाले, निगेटिव्हज टिकवणे महत्त्वाचे आहे आणि ते पुण्यात एनएफएआयमध्ये जतन केले जातील याबद्दल मला फार आनंद होत आहे. चित्रपटांचे जतन करणे हे निर्मात्याचे कर्तव्य आहे आणि मी सर्व चित्रपट निर्मात्यांना या महत्त्वपूर्ण कामासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सहकार्य करण्याचे आवाहन करतो.
पीकेच्या मूळ कॅमेरा निगेटिव्हजबरोबरच सुमारे ३०० कॅन्स एवढ्या या चित्रपटाच्या रशेस आणि ३ इडियट्स चित्रपटाच्या आउटटेक्स जतन करण्यासाठी सोपविण्यात आल्या. पोस्टर, लॉबी कार्ड आणि हिरानी दिग्दर्शित चित्रपटांचे छायाचित्र असलेले मोठे पेपर मटेरियलसुद्धा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.