जागा १५; उमेदवार ९३
By admin | Published: February 19, 2015 11:33 PM2015-02-19T23:33:50+5:302015-02-19T23:33:50+5:30
एक हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात तब्बल ९३ उमेदवार उतरले आहेत.
सोमेश्वरनगर : एक हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात तब्बल ९३ उमेदवार उतरले आहेत. जिल्हा बँकेप्रमाणे आता या बँकेलाही इच्छुक वाढले आहेत. संचालकपदासाठी ग्रामीण भागातील सभासदांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.
बारामती बँकेच्या एकूण ११ हजार ५९९ मतदारांपैकी बारामती व जळोची शाखेतून ५ हजार ३८८ मतदार आहेत. इतर ६ हजार २११ मतदार बारामती शहराबाहेरील आहेत. बाहेरील मतदारांपैकी इंदापूर शाखेला ८९० मतदार, दौंड शाखेला ६७८ मतदार, भिगवण शाखेला ६०० मतदार तर नीरा शाखेला ४६७ मतदार, मार्केट यार्डला ७६० तर पिंपरी चिंचवड शाखेला ६७२ मतदार आहेत. सातारा, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील शाखांमध्येही दोनशे ते चारशेंच्या आसपास मतदार आहेत.
या वेळी बँकेवर पंधरा जणांचे संचालक मंडळ असणार आहे. दहा जण खुल्या गटातून, दोन महिला, एक ओबीसी, एक एसटी किंवा एससी, एक एनटी अशी वर्गवारी असेल. शिवाय दोन स्वीकृत संचालक घेतले जाणार आहेत.
या वेळी शहराबाहेरून चार-पाच जणांना संधी दिली जाईल तर शहरातून दहा-बारा जणांना निवडले जाईल, असा अंदाज आहे.
या वेळी अर्जांच्या छाननीनंतर ९३ जणांचे १३४ अर्ज शिल्लक आहेत. ९३ जणांपैकी दहा जण शहराबाहेरील शाखांकडून इच्छुक उमेदवार म्हणून पात्र ठरले आहेत. यामध्ये सातारा शाखेकडून विकास नलवडे हे एकमेव इच्छुक आहेत. दौंड व मार्केट यार्डमध्ये सभासदसंख्या चांगली असूनही अर्ज दाखल नाहीत. इंदापूरमध्ये इंदापूर व भिगवण या दोन शाखा आहेत. मात्र विद्यमान संचालक सुनीता कोरटकर पुन्हा इच्छुक आहेत.
याशिवाय सर्जेराव काळे, आनंद देशपांडे, अशोक घोगरे असे आणखी तिघे जण इच्छुक आहेत. बारामती तालुक्यातील पणदरे येथील नारायण कोकरे, अलंकार जगताप, दिलीप जगताप यांच्यासह विद्यमान संचालक विलास जगताप पुन्हा इच्छुक आहेत. तर पुरंदर तालुक्यातील नीरा शाखेकडून बारामतीच्या पश्चिम भागातील राज्य सराफ महामंडळाचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर
यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. नीरा शाखेशी बारामतीचा पश्चिम भाग, पुरंदर, खंडाळा व फलटण हे तालुके जोडले
गेल्याने स्वतंत्र संचालक मिळावा अशी अपेक्षा सभासदांनीही व्यक्त केली आहे. शाखा स्थापनेपासून या शाखेला आपला संचालक मिळालेला नाही. (प्रतिनिधी)
४मागील संचालक मंडळामध्ये इंदापूरमधून सुनीता कोरटकर व बारामती ग्रामीणमधून विलास जगताप यांना संधी मिळाली होती. या वेळी पक्ष त्याच चेहऱ्यांना निवडतो की नवीन चेहऱ्यांना संधी देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
४मागील काळात राष्ट्रवादीची पीछेहाट झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठांनी आगामी निवडणुकीत नवे व निष्ठावान चेहरे देणार असल्याचे सूतोवाच केले होते. यामुळे ग्रामीण भागातही बँकेच्या संचालकपदाची संधी मिळणार का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
४विशेषत: नीरा शाखेतून पंधरा वर्षांतून प्रथमच किरण आळंदीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. ते सराफआणि सोनार समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांची निवड होऊन आपल्याला प्रतिनिधी मिळणार का, याकडे नीरा-सोमेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.