देखणे यांच्यासारख्या लोकसाहित्य उपासकाच्या खांद्यावर संमेलनातील ग्रंथ पालखी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:41+5:302021-01-22T04:10:41+5:30
पुणे : संतसाहित्याचे, लोककलेचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करा, अशी विनंती शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीसह ...
पुणे : संतसाहित्याचे, लोककलेचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करा, अशी विनंती शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीसह पुण्यातील विविध संस्थांनी केली. कीर्तनकार, पोतराज, शाहीर, गोंधळी, वाघ्या-मुरळीच्या वेशातील कलाकारांनी महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करून ही विनंती केली आहे.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीसह श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा, महाराष्ट्र वाघ्या-मुरळी परिषद या संस्थांनी डॉ. रामचंद्र देखणे यांना नाशिक येथे होणा-या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे, अशी विनंती करण्यासाठी कसबा पेठेतील साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या निवासस्थानासमोरील पिंपळाच्या पारासमोर कार्यक्रम केला. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, रामचंद्रबुवा गो-हे, तारा देशपांडे, जयश्री देशपांडे, प्रा.संगीता मावळे, राहुल पवार, श्रीकांत रेणके, अरुणकुमार बाभुळगावकर, ओंकार चिकणे आदी उपस्थित होते.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, डॉ. देखणे हे साहित्य व लोककला क्षेत्रातील एक अभ्यासू व नामवंत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक कलांच्या माध्यमातून कलावंतांचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे नाशिक येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळावे, अशी विनंती आम्ही करीत आहोत. यामुळे डॉ. देखणे यांच्यासह आम्हा लोककलावंतांचा देखील सन्मान होईल.