‘शिवसंस्कार सृष्टी'साठी जलसंपदा विभागाची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:12+5:302021-06-05T04:08:12+5:30
---- नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीमध्ये 'शिवसंस्कार सृष्टी'साठी जलसंपदा विभागाची जागा देण्यास राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तत्त्वतः मान्यता ...
----
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीमध्ये 'शिवसंस्कार सृष्टी'साठी जलसंपदा विभागाची जागा देण्यास राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून, रीतसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची 'शिवसंस्कार सृष्टी' साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडाच्या परिसरात 'शिवसंस्कार सृष्टी' उभी राहावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जागा दिल्यास निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. त्या अनुषंगाने खासदार डॉ. कोल्हे यांनी जलसंपदा विभागाच्या मालकीची जागा सुचवली होती. त्यानुसार पत्रव्यवहार सुरू होता. त्यानुसार जागा मागणीसाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत झालेल्या या बैठकीला आमदार अतुल बेनके, जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, पर्यटन सचिव व्हल्सा नायर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.
या बैठकीत 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाच्या सादरीकरण पाहून प्रभावित झालेल्या जलसंपदामंत्री पाटील यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत साकारण्यात येणाऱ्या 'शिवसंस्कार सृष्टी'साठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवून प्रस्ताव तयार करण्याच्या निर्देशही दिले.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर झाला आहे. मात्र पर्यटनवाढीच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्यातून तालुक्यात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे आमदार बेनके यांच्या सहकार्याने आपण हा प्रकल्प लवकरात लवकर तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रकल्प मोठा असून जुन्नरच्या लौकिकात भर घालणारा असल्याने उभारणीसाठीच्या आवश्यक बाबींची जुळवाजुळव करणे यासाठी आमदार बेनके व आपण समन्वयाने पाठपुरावा करणार आहोत, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
--