‘प्लेसमेंट’ विद्यार्थी आणि शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:43+5:302021-09-09T04:13:43+5:30

औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाकडे काही विशेष कौशल्य असल्याशिवाय त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन कार्यकालातच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य ...

‘Placement’ students and teachers | ‘प्लेसमेंट’ विद्यार्थी आणि शिक्षक

‘प्लेसमेंट’ विद्यार्थी आणि शिक्षक

googlenewsNext

औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाकडे काही विशेष कौशल्य असल्याशिवाय त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन कार्यकालातच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भिंतीबाहेरील कृतियुक्त शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे. क्षेत्रभेटी, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचे कौशल्य, एकत्रितपणे काम करण्याची मानसिकता, शारीरिक व बौद्धक क्षमतांचा विकास अशा अनेक विषयांतील अध्ययन, अध्यापन तंत्राचा वापर करणे म्हणजेच शिक्षणाचे संक्रमण आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचा संबंध आपल्या शिक्षणाशी जोडला तरच शैक्षणिक व वैचारिक संक्रमण घडेल. आजचे शिक्षण खऱ्या अर्थाने प्रयोगशील होऊ पाहात आहे. या प्रक्रियेत सर्व शिक्षकांना फार मोठी जबाबदारी पार पाडावयाची आहे. या प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका ही आता बदलू लागली आहे. या संक्रमणाच्या युगात केवळ विद्यार्थ्यांच्या विकासाच्या मार्गातील मार्गदर्शक व सहायक बनायला हवे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये विवेक व मूल्यांचा संस्कार करण्यामध्ये महत्वाचा सहभाग हवा. यातून शिक्षणाचे योग्य संक्रमण होईल.

--------------

स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून त्यावरून नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये, अशा मानसिक तणावातून सध्याचा तरुण वर्ग जात आहे. त्यामुळे प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

स्वत:ला जाणून घ्या

स्वत:मधील चांगल्या आणि वाईट गोष्टींची एक यादी तयार करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा. तुमच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा. तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही.

स्वत:चे मत असू द्या

कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तीला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहित धरू लागतात. यात तुमचे नुकसान होते.

नवीन लोकांना भेटा

असे म्हटले जाते, की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते.

वाचन करा, नवीन छंड जोपासा

वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करत असतो. त्यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा.

चांगला श्रोता व्हा

समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्त्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून कंटाळतात आणि तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात.

इतरांचा आदर राखा

देशात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला. सन्मान दाखवला, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी झळाळी मिळते. त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होतो.

देहबोलीवर भर देणे गरजेचे

समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना, बोलताना अगदी सहज राहा. तुमच्या देहबोलीवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही देहबोलीला खूप महत्त्व आहे.

आत्मपरीक्षण करा

प्रत्येकाने स्वत:चे आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या-वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते.

आत्मविश्वास बाळगा

प्रत्येकाकडे आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण अतिआत्मविश्वास बाळगू नका. त्यात तुमचे नुकसान असते. पण स्वत:ला दुर्लक्षितही करू नका. अन्यथा तुमच्यात क्षमता असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता.

-------------

- डॉ. संदीप मेश्राम, सहयोगी प्राध्यापक व माजी अधिष्ठाता कॉर्पोरेट रिलेशन्स, सीओईपी

Web Title: ‘Placement’ students and teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.