खाद्यसंस्कृतीची ठिकाणे ही पुण्याचे ‘हेरिटेज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:31+5:302020-12-31T04:11:31+5:30
डॉ.विनीता आपटे : किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार प्रदान- -किशोर-अभय सरपोतदार यांना ‘निनाद अन्नब्रह्म’ ...
डॉ.विनीता आपटे : किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार प्रदान-
-किशोर-अभय सरपोतदार यांना ‘निनाद अन्नब्रह्म’ पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये कमालीचे वैविध्य आहे. अनेक ठिकाणी खाद्यसंस्कृती वर्षानुवर्षे जपली जात आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृतीची ठिकाणे ही पुण्याचे ‘हेरिटेज’ असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विनीता आपटे यांनी व्यक्त केले.
निनाद पुणे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्यातर्फे अन्नब्रह्म पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले होते. पाककला क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा ‘निनाद अन्नब्रह्म’ पुरस्कार देण्यात आला. कै. महादेव वामन जोशी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
यावेळी निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, शर्मिला सरपोतदार, रामलिंग शिवणगे, शुभदा जोशी, अजित कुमठेकर, आनंद सराफ, सुनील केसरी, सुनील महाजन उपस्थित होते. सन्मानपत्र आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते. कमलाकर सावंत यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
किशोर सरपोतदार म्हणाले की, अनंत लोकांच्या योगदानामुळे पूना गेस्ट हाऊस संस्था उभी आहे. माझ्या काकांनी, आजोबांनी आणि वडिलांनी या संस्थेला सामाजिकतेची जोड दिली. उदरनिर्वाहाचे काम करतानाही सामाजिक कार्यसुद्धा उत्कृष्टपणे करता येते याचे पूना गेस्ट हाऊस हे एक उदाहरण आहे.