बकाल स्वरूप येण्यापूर्वीच नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:30+5:302021-03-30T04:08:30+5:30
वडाची वाडी येथील ग्रामस्थांची वाढत्या अतिक्रमणांमुळे अपेक्षा ........................................ दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या परिघावरील वडाची ...
वडाची वाडी येथील ग्रामस्थांची वाढत्या अतिक्रमणांमुळे अपेक्षा
........................................
दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराच्या परिघावरील वडाची वाडी येथे नवीन बांधकामांना वेग आला आहे. वाढत्या नागरिकरणामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. महापालिकेने प्राधान्याने नियोजन केल्यास गाव बकाल होणार नाही, असे त्यांना वाटते.
वडाची वाडी गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार असून वार्षिक महसूल ६५ लाख रुपये आहे. त्या माध्यमातून गावात वेगवेगळ्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मात्र, नागरिकांना होणारा जाच कमी झालेला नाही.
गावात इतरत्र ठिकाणी शेतमजुरी, बांधकाम मजुरी करणारा तसेच विविध औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मोठी संख्या आहे.
गावात अद्याप सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने स्वच्छतागृहे बांधून द्यावीत, अशी मागणी गावातील काही जेष्ठ नागरिकांनी केली. त्याचबरोबर गावात विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा नाही, उद्यान नाही, त्यामुळे आम्ही संध्याकाळी फिरण्यासाठी आणि सकाळी सकाळी व्यायामाला जायचं कुठे, असा सवाल गावातील युवकांनी विचारला. आम्हाला महापालिकेकडून मोठ्या अपेक्षा आहेत हेही ते आवर्जून सांगतात.
गावात आसपास महाविद्यालयांची सुविधा नसल्याने महाविद्यालयीन तरुणांना पुणे शहरात किंवा शाळेसाठी कात्रजला इतर ठिकाणी जावे लागते. महापालिकेने आम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठीही प्रयत्न करावेत, असेही काही विद्यार्थ्यांनी नमूद केले.
वाढत्या नागरीकरणामुळे आता वडाची वाडीला शहराचं रुप येत आहे. मोठमोठी बांधकामे सुरू झाली आहे. गाव बकाल होऊ नये याची काळजी महापालिकेने घ्यायला हवी. आता गावात अतिक्रमण वाढत आहे. त्यातून रस्त्यांना जागा कमी पडते. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर अतिरिक्त बांधकामांवर निर्बंध आणावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली
____________________________________
गावात शेतमजूर आणि कामगारवर्ग मोठा आहे. आधीच टाळेबंदीने लघुउद्योगाचे कंबरडे मोडले असून आता पुन्हा बंधनांमुळे कामगारवर्गाचे प्रचंड हाल होत आहे, महापालिका आणि सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी.
-अर्जुन कांबळे, व्यावसायिक
_________________________
_________________________
याआधी जी अकरा गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात आली, त्यांचा पायाभूत सुविधांचा विकास झाला का? तर नाही, मग आमच्या गावाचा समावेश करुन फक्त राजकीय उद्देश साधला जाईल.
- रोहित जाधव, युवक
_________________________
फोटो ओळ
गावातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा टाकला जात असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.