कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:05 AM2021-05-03T04:05:36+5:302021-05-03T04:05:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच बाधित रुग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. लसीकरणाला गती देण्यावर प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, अतुल बेनके, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग व टेस्टिंग, कंटेन्मेंट झोन, लसीकरण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन मागणी, ऑक्सिजन व रेमडेसिविर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
ऑक्सिजन, रेमडेसिविरची जिल्ह्याची मागणी व सुरळीत पुरवठा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
लस मर्यादित असल्याने लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये
अजित पवार म्हणाले, प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा. ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. परंतु, लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे.