लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेऊन नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:39+5:302021-05-16T04:09:39+5:30
बारामती: बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...
बारामती: बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. शासकीय व खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच, कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात यावे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
—————————————————
विद्या प्रतिष्ठान सभागृहातील बैठकीत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर.
१५०५२०२१ बारामती—०२