वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आराखडा
By admin | Published: October 14, 2015 03:25 AM2015-10-14T03:25:44+5:302015-10-14T03:25:44+5:30
पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार आज प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार आज प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी व शिक्रापूर या ठिकाणी पाहणी करून, ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
वाहतूककोंडी होणाऱ्या प्रत्येक चौकामध्ये तत्काळ ‘नो-पार्किंग’ झोन तयार करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कोरेगाव भीमा येथे पुणे-नगर महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज सकाळी प्रांताधिकारी सोनाप्पा यमगर, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पाटील, बाजारपिके समितीचे संचालक राहुल गवारे, उद्योजक जयेश शिंदे, सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच नितीन गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
पुणे-नगर महामार्गावर सातत्याने वाहतुकीस होणाऱ्या अडथळ्यांमुळे सतत होणारी वाहतूककोंडीमुळे प्रवासी, नागरिक, शेतकरी, कामगार, उद्योजक, विद्यार्थी व रुग्ण यांसह सर्वच जण त्रस्त आहेत.
याबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दि.९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती.
यापिके वेळी जिल्हाधिकारी राव यांनी या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा करून ठोस कृती आराखडा करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज सकाळी कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर याठिकाणी प्रांताधिकारी सोनाप्पा यमगर यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी तसेच स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली.
त्यानुसार कोरेगाव भीमामध्ये महामार्गालगतचा पदपथ काढणे व इतर अडथळे दूर करण्याबरोबरच ‘नो-पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करणे, रोज दुपारी ३ ते ७ या वेळेत मुख्य चौकातील दुभाजक बंद करणे, बेशिस्तपणे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी नजीकच्या काळात दुभाजकांवर लोखंडी बॅरिगेट उभारणे, तसेच गुरुवारच्या आठवडे बाजाराचेही योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
(वार्ताहर)