वाळू व्यवसायाच्या वादातूनच ‘त्यांनी’ रचले खुनाचे कटकारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:51 PM2018-08-27T20:51:41+5:302018-08-27T20:53:50+5:30
देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एकाचा दगडाने ठेचून व धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.
यवत : दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खुनाचा कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात लावलेल्या कलमांमध्ये कट रचण्याचे कलम वाढविले असून यात आणखी एक आरोपी वाढला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
स्वप्नील उर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार (वय - ३०) याचा दगडाने ठेचून व धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.याप्रकरणी यवत पोलिसांनी काही तासातच तपासाची जोरदार चक्रे फिरवत सोमनाथ विष्णू शेलार, विशाल उर्फ बाबू मेमाणे , रणजित उर्फ बाबू वांझरे , बबलू विश्वास डेंगळे व अनिल उर्फ सुनील शितोळे यांना अटक केली होती. या सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यवत पोलिसांनी काही तासातच खुनाचा तपास लावून पाच आरोपींना अटक केली होती. तर फिर्यादीत नमूद केलेले आरोपी असलेले चौघे आरोपी फरारी झाले होते. पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू व्यवसायच्या वादातून यापूर्वी राहू येथे दुहेरी खून घडला होता. दिवसा ढवळ्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपी संतोष संपत जगताप व समीर संपत जगताप यांचा देलवडी येथे युवकाच्या खुनात सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद होते. ते दोघे अजूनही फरार आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहे.