पुणे झालंच नाही सायकलींच शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 04:39 PM2019-04-07T16:39:03+5:302019-04-07T16:41:37+5:30
शेअर सायकल याेजनेतील सायकल आता वापरनाविना घूळखात पडल्याचे चित्र आहे.
पुणे : दाेन वर्षांपूर्वी पुण्यात शेअर सायकल याेजना सुरु करण्यात आली. सुरवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु करण्यात आलेली ही याेजना हळूहळू शहरातील जवळ जवळ सर्वच भागांमध्ये सुरु करण्यात आली. यात नंतर अनेक सायकल कंपन्या समाविष्ट झाल्या. सुरवातीला अवघ्या एका रुपयामध्ये या शेअर सायकली भाड्याने मिळत हाेत्या. त्यातही या सायकली ऑनलाईन पद्धतीनेच भाड्याने घेता येत असल्याने नागरिकांसाठी साेयीचे हाेते. परंतु गेल्या दाेन वर्षात ही याेजना नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात प्रशासन कमी पडल्याने तसेच नागरिकांनी देखील या याेजनेकडे पाठ फिरवल्याने सध्या या शेअर सायकली धूळखात पडल्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुण्याला पुन्हा सायकलींचे शहर करण्याचे स्वप्न आता कागदावरच राहिले आहे.
पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत जानेवारी 2017 ला शेअर सायकल याेजना शहरात सुरु करण्यात आली. विद्यापीठामध्ये पायलट प्राेजेक्ट म्हणून ही याेजना सुरु करण्यात आली. याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शहरातील इतर भागांमध्ये ही याेजना सुरु करण्यात आली. या सायकल घेण्यासाठी आणि पुन्हा ठेवण्यासाठी विविध सायकल स्टेशन्स उभारण्यात आली. हळूहळू यात अनेक सायकल कंपन्या आल्या. काही कंपन्यांनी सुरुवातीला माेफत सायकल वापरण्यास दिल्या. सुरुवातीला मिळालेलाल चांगला प्रतिसाद काही काळाने मावळला. सायकलींची ताेडफाेड ते चाेरीच्या घटना अशा अनेक कारणांमुळे काही कंपन्यांनी या याेजनेतून माघार घेतली.
सुरुवातीच्या वर्षात पुणेकरांनी या याेजनेला चांगला प्रतिसाद दिला. परंतु नंतरच्या काळात कंपन्यांनी सुद्धा सायकलचे भाडे वाढविल्याने पुणेकरांनी देखील या याेजनेकडे पाठ फिरवली. त्यातच सातत्याने सायकलींची ताेडफाेड झाल्याने कंपन्यांना आर्थिक नुकसानाला सामाेरे जावे लागले. सध्या एकाच कंपनीच्या सायकल या याेजनेत असून त्याही ठराविक भागातच पाहायला मिळत आहेत. जेएम रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता साेडल्यास दुसरीकडे या सायकल नाहीत. तसेच या दाेन ठिकाणी असलेल्या सायकल देखील वापराविना धूळखात पडल्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एक चांगली याेजना बंद हाेण्याचा मार्गावर सध्या असल्याचे दिसून येत आहे.