बिबट्याप्रवण क्षेत्राबाबत उपाययोजनांचा आराखडा

By Admin | Published: September 23, 2015 03:08 AM2015-09-23T03:08:08+5:302015-09-23T03:08:08+5:30

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यातील ७० गावे हे बिबट्यांच्या नागरी वस्तीजवळील वास्तव्याने संवेदनशील गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत़

Plan of Measures for Leopard Area | बिबट्याप्रवण क्षेत्राबाबत उपाययोजनांचा आराखडा

बिबट्याप्रवण क्षेत्राबाबत उपाययोजनांचा आराखडा

googlenewsNext

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यातील ७० गावे हे बिबट्यांच्या नागरी वस्तीजवळील वास्तव्याने संवेदनशील गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत़ या गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत़ या गावांमध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या उपाय योजना करण्यात येणार आहे़
वन विभागाने यापूर्वी आंबेगाव आणि जुन्नरमधील बिबट प्रवण क्षेत्र म्हणून संवेदनशील ५९ गावे निश्चित केली होती़ गेल्या काही महिन्यात शिरुर तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्या आढळल्याने आता या गावांची संख्या ७० झाली आहे़ याबाबत उपवनसंरक्षक व्ही़ ए़ धोकटे म्हणाले, जंगलात असलेल्या बिबट्यांनी आता ऊसाच्या शेताला आपले आश्रयस्थान बनविल्याने या गावातील पाळीव जनावरे तसेच गावातील कुत्री व अन्य प्राणी त्यांचे भक्ष्य होत आहे़ त्यातूनच मग माणसांवरही हल्ल्याचे प्रकार होऊ लागले आहेत़ या परिस्थितीत तेथील जनजीवन व जनावरे यांचे सरंक्षणाच्या दृष्टीने वन विभागाने उपाय योजनांचे आराखडे तयार केले आहेत़
या गावातील ग्रामस्थांना वन विभागाने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे़ त्यात बिबट्या दिसला तर काय करायचे? त्याच्यापासून स्वत:चे स्वंरक्षण कसे करायचे? याची माहिती ग्रामस्थांचे गट बनवून देण्यास सुरुवात केली आहे़ आतापर्यंत ५५ ग्रामस्थांना प्रशिक्षित केले आहे़ त्याचबरोबर जनजागृतीसाठी शाळेत माहिती देणे, वृक्षदिंडी, सभा घेतल्या जात आहे़ या गावांमध्ये होल्ंिडग लावून काय काळजी घ्यावी हे सांगितले जात आहे़
प्रमुख चार उपाययोजना
या गावांमध्ये ४ प्रमुख उपाय योजना करण्यात येणार आहे़ त्यात शौच्छासाठी ग्रामस्थांना रात्री, पहाटे रानात जावे लागते़ तोच वेळी या प्राण्याचे शिकारीसाठी बाहेर पडण्याचा काळ असतो़ त्यामुळे या सर्व गावात १०० टक्के वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे़ गोठ्यातील जनावरे बिबट्याची सहज शिकार होतात़ त्यासाठी बंधिस्थ गोठ्याचे मॉडेल तयार करण्यात आले असून ते उभारण्यास नरेगामार्फत सहाय्य देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे़ या गावातील विहिरीना कठडे नसल्याने अनेकदा शिकारीचा पाठलाग करताना बिबटे त्यात पडल्याची उदाहरणे आहेत़ अशा विहीरींचा सर्व्हे होत असून त्यांना कठडे बांधण्यात येणार आहे़ या गावांमध्ये अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे़
ग्रामीण भागात अनेकदा पहाटे वीज खंडीत होते़ त्यामुळे गावातील भटकी कुत्री, जनावरे बिबट्यांचे आयतेच सावज ठरतात़ या गावांना अखंडित वीजपुरवठा होईल, यासाठी उपाय करण्यास महावितरणला सांगितले आहे़ शेतीसाठी थ्री फेजवरुन वीजपुरवठा हा पहाटे अथवा रात्री केला जातो़ त्यामुळे शेतकऱ्यांना नार्ईलाजाने वीज असेल, त्यावेळी मोटार सुरु करण्यासाठी अवेळी शेतात जावे लागते़ हे टाळण्यासाठी शेतीकरिता दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़
या गावांमध्ये करायच्या उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या समवेत आतापर्यंत ४ बैठका झाल्या असून आवश्यक त्या उपाय योजनांसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्यांना मान्यता मिळताच त्या विविध योजनांद्वारे त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्य वनसंरक्षक जीतसिंग यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Plan of Measures for Leopard Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.