"भविष्यात पर्यावरणाचा विचार करून एचसीएमटीआरऐवजी निओ मेट्रोचे नियोजन करा" - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 06:56 PM2021-07-09T18:56:39+5:302021-07-09T18:56:46+5:30
पुणे महापालिकेच्या 'पुण्यदशम' या दहा रुपयात दिवसभर वातानुकूलित प्रवास या योजनेचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला
पुणे: शहरात पालिकेकडून 'एचसीएमटीआर' प्रकल्प उभारला जाणार होता. त्याची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र, जादा दराने निविदा आल्याने ही निविदा रद्द करण्यात आली. भविष्यात पर्यावरणाचा विचार करून एचसीएमटीआरऐवजी निओ मेट्रोचे नियोजन करावे. कमी खर्चाचा हा प्रकल्प हायब्रीड कॉरिडॉरमध्ये परावर्तित करायचा किंवा निओ मेट्रो करायचा याचे नियोजन करावे. महामेट्रोला आराखडा करण्याचे आणि प्रकल्पाचे काम द्यावे अशा सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील पदाधिकाऱ्यांना केल्या.
पुणे महापालिकेच्या 'पुण्यदशम' या दहा रुपयात दिवसभर वातानुकूलित प्रवास या योजनेचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुण्याला प्रदूषण मुक्तीसाठी 'स्वच्छ बस आणि स्वच्छ इंधन' आवश्यक आहे. भविष्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रो आणि बससाठी सिंगल तिकीट योजना सुरू केली जाणार असून लोकांना बससंदर्भात एकत्रित माहिती देणारे मोबाईलचे डिजिटल अँप तयार केले जाणार आहे. त्यावर प्रवाशाला आपला संपुर्ण 'ट्रॅव्हल प्लान' तयार करता येणार असल्याचेही ते म्हणाले. देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक बस पुण्याने खरेदी केल्या. लोकांना सार्वजनिक वाहतुकीची सवय लागायला हवी. मेट्रोचे काम वेगात सुरू असून त्याची चाचणी सुरू आहे. नागपूर आणि पुण्यात वेगात काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, रामभाऊ म्हाळगी यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले. पुण्यदशम बसच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विचार करून योजना आणण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय १०५ जागा जिंकेल. विरोधकांना निवडणुकीत उमेदवार मिळणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी त्यांचा पराजय पक्का असल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले.
सारसबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅन्सर हॉस्पिटल उभारणार - हेमंत रासने
रामभाऊ म्हाळगी जन्म शताब्दीच्या निमित्ताने ईजनेला सुरुवात केली. सर्वसामान्यांना परवडणारी योजना आहे. उच्च दर्जाची सेवा अल्प दारात उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकारकडून पैसे न घेता कोरोनाचा पालिकेने सामना केला. पुणेकरांवर कर वाढ न लादता उत्पन्नात वाढ केली. सारसबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान आणि नानाजी देशमुख कॅन्सर हॉस्पिटल उभे केले जाणार आहे. असे रासने यांनी सांगितले.