समाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 11:38 AM2020-09-29T11:38:40+5:302020-09-29T11:39:13+5:30
जायका प्रकल्पासाठी 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट' तयार करणार
पुणे : पालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी आराखडा तयार असून पाणी पुरवठा आणि मलनि: स्सारण यावर विशेषतः काम केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक झाली असून ह कामे करणे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले.
पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या अकरा गावांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करणे आवश्यक आहे. कोरोना काळात विकास कामांना खीळ बसला आहे. आता हळूहळू आवश्यकता पाहून कामे सुरू केली जातील. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांसोबत बैठकीमध्ये याविषयावर चर्चा झाली असून कोणकोणती कामे करता येतील याचा आढावा घेतला जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
-------
जायकासाठी 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट'
महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नदी सुधार योजना (जायका प्रकल्प) मार्गी लावण्याकरिता 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट' स्थापन करण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून येत्या ऑक्टोबरपासून काम सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची आवश्यकता असून सल्लागार कंपणीलाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
-------
शहरातील उद्याने सुरू करण्याबाबत मंगळवारी महापौरांसोबत बैठक घेतली जाणार आहे. उद्यानातील गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर राखले जाणे, ओपन जिमचा सांभाळून वापर करणे आदींबाबत विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात अटी व शर्ती तयार करून त्यादृष्टीने परवानगी द्यायची की नाही हे बैठकीत ठरेल असे आयुक्त म्हणाले.
---------
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मैदानाची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे सध्या मैदाने बंद आहेत. त्यामुळे शहरातील तरुणांची गैरसोय होऊ नये याकरिता पालिकेच्या शाळांमधील मैदाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या मैदानांवर तरुण पोलीस भरतीची शारीरिक तयारी करु शकतील.