वैमानिकाचे करावे तेवढे कौतुक कमीच! ताशी २२२ किमी. वेग असताना टळला विमानाचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 08:47 PM2020-02-15T20:47:58+5:302020-02-15T20:53:18+5:30
उड्डाणावेळी धावपट्टीवर आली जीप : १८० प्रवासी होते विमानात
पुणे : पुणेविमानतळावर एअर इंडियाच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानातील १८० प्रवासी अपघातातून थोडक्यात बचावले. विमान उड्डाण करताना धावपट्टीवर अचानक जीप आडवी आली. या प्रकारामुळे वैमानिकाने काही अंतर आधीच उड्डाण केले. त्यामुळे विमानाचा खालचा भाग धावपट्टीला घासून गेल्याने विमानाचे नुकसान झाले. दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे विमान उतरल्यानंतर ही बाब लक्षात आली. वैमानिकाने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे विमानतळावर मोठा अपघात टळला.
एअर इंडिया कंपनीचे विमान (एआय ८५२) सकाळी ७.५५ वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीकडे उड्डाण करणार होते. त्यानुसार सुमारे १८० प्रवासी व कर्मचाऱ्यांना घेऊन हे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले. उपलब्ध माहितीनुसार, धावपट्टीवरून पुढे जात असताना काही अंतरावर एक जीप उभी असल्याचे वैमानिकाचे लक्षात आले. विमानाचा वेग जवळपास ताशी २२२ किमी असल्याने विमान थांबविणे शक्य नव्हते. त्यामुळे नियोजित अंतराआधीच वैमानिकाने तातडीने विमानाचे उड्डाण केले. पण हे विमान धावपट्टीला घासून गेल्याने मागील बाजुचे विमानाचे आवरण निघाले. त्यानंतरर दिल्ली विमानतळावर हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात झाला नाही.
हेच विमान पुढे श्रीनगरला जाणार होते. त्याआधी तपासणी करताना विमानाचा खालील भागाला काहीतरी घासल्याचे लक्षात आले. त्यानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. नागरी विमानवाहतुक महासंचालनालया(डीजीसीए) ने घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. पुणे विमानतळ हे भारतीय हवाई दलाचे आहे. त्यामुळे या विमानतळावर हवाई दलाच्या नियमित कामे सुरू असतात. त्यामुळे ‘डीजीसीए’ने एअर ट्रॅफिक कंट्रोलचे रेकॉर्डिंग ठेवण्यास सांगितले आहे. तसेच एअर इंडियाकडूनही कॉकपीटमधील ध्वनीमुद्रणही मागविण्यात आले आहे. चौकशीसाठी हे विमान सेवेतून बाहेर काढण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
------------
श्रीनगरला उड्डाण करणाºया विमानाच्या मागील बाजुला काही घासल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे विमान चौकशीसाठी सेवेतून बाजुला करण्यात आले आहे. कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि सॉलीड-स्टेट फ्लाईट डाटा रेकॉर्डर (एसएसएफडीआर) द्वारे माहिती मिळविली जाईल.
- धनंजय कुमार, प्रवक्ते, एअर इंडिया
------------
धावपट्टीवर विमानाने ठराविक वेग घेतल्यानंतर ते अचानक थांबविणे शक्य नसते. त्यामुळे धावपट्टीवर जीप दिसल्यानंतर वैमानिकाने तातडीने उड्डाण करण्याचा निर्णय घेतला असावा. पण अचानक उड्डाणामुळे विमानाची पुढील बाजु थोडी अधिक वर गेली असेल. त्यामुळे मागील बाजुला धावपट्टीला घासली. वेगात असलेले विमान थांबविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित विमान जीपला धडकले असते. त्यामुळे वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक आहे. पण त्याचवेळी विमान धावपट्टीला घासल्यानंतर ते त्यांच्या लक्षात येणे अपेक्षित होते. कदाचित लक्षात आले असले तरी कोणताही धोका नसल्याने ते दिल्लीपर्यंत नेण्यात आले असावे. पण धावपट्टीवर विमान उड्डाणावेळी अशाप्रकारे जीप येणे, ही बाब खुपच गंभीर आहे. एअर ट्रॅॅफिक कंट्रोलची ही जबाबदारी असून मानवी चुक आहे. याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतुक तज्ज्ञ