...अाणि अाळंदीतून झेपावली विमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 08:54 PM2018-04-16T20:54:51+5:302018-04-16T20:57:08+5:30
एमअायटी विश्वशांती गुरुकुलातर्फे एराेमाॅडेलिंग शाे चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी सादर करण्यात आलेल्या कसरतींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.
पुणे : ‘स्वस्तिक’नावाच्या ग्लायडर ने आकाशात प्रथम झेप घेतली अाणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बलसा लाकडापासून तयार केलेले ‘जेनी’विमान व दोन पंखांचे ‘बायप्लेन’,‘स्टींगरे’या विमानाने केलेल्या व्हर्टिकल रोल मध्ये एअरफोर्स सारख्या कसरतीनांही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर थर्माकोलपासून विकसित केलेली ‘उडती तबकडी’ आकाशात झेपावली. ‘हेलिकॉप्टर’ ने अनेक पलट्या व कोलांटयाउडया घेवून आकाशात बहारदार सादरीकरण करुन उपस्थितांच्या डाेळ्यांचे पारणे फेडले,निमित्त हाेते केळगांव, अाळंदी येथे विश्वशांती गुरुकुल अायाेजित एराेमाॅडेलिंग शाे चे. यावेळी एराेमाॅडेलर सदानंद काळे,एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, आळंदी येथील गुरुकुलाचे प्राचार्य अशोक जैन आदी उपस्थित हाेते.
या प्रसंगी बाेलताना सदानंद काळे म्हणाले, बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, तांत्रिक कौशल्य, एकाग्रता, अचूक व तत्काळ निर्णय क्षमता, चिकाटी, साहस आणि संयम या सारखे गुण एरोमॉडलिंगच्या छंदामुळे मुलांमध्ये वृद्धिंगत होतात. भविष्यात जर देशाला चांगले पायलट हवे असतील तर शासनाने एरोमॉडेलिंगला मदत व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. तसेच वर्तमानकाळात हवाई विज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. शासकीय व खाजगी क्षेत्रात तरूण उत्तम प्रकारे करियर करु शकतात. प्राथमिक शिक्षणापासून विमानाच्या सहवासात असणार्यांना भविष्यात एरो इंजिनियर व पायलट होण्यास मदत होईल. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स व रशिया इ. देशात विमान बनविणे व उडविणे हा छंद जोपासला जातो. तेथे एरोमॉडेलिंगच्या स्पर्धा होतात. त्यात लहानांपासून सर्व वयोगटातील लोक सहभागी होतात. तसेच, एरोमॉडेलर्सना स्टेडियम उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज आहे. याच्या प्रसारासाठी प्रत्येक शहरात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एरोमॉडेलिंग क्लब स्थापन व्हावेत असेही ते यावेळी म्हणाले.
प्रा. राहुल कराड म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये विमान उड्डाणाची आवड निर्माण व्हावी व त्यातील विज्ञान समजून दयावे, यासाठी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती गुरुकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे परिपूर्ण शिक्षण देण्यात येणार आहे. येथून नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करणारे विद्यार्थी बाहेर पडतील.
साधारणपेण मोठ्या शहरांमध्ये एरोमॉडेलिंग शो चे स्पेशल स्टंट पहावयास मिळतात, परंतू या वेळेस आळंदी स्थित हनुमंतवाडी, केळगांव येथील गुरुकुलात आयोजित एरोमॉडेलिंग शोमध्ये छोट्या हवाई जहाज (एरोमॉडेल्स) च्या कसरती पहावयास मिळाले. येथे २ फूटाचे छोटे एरोमॉडेल्सपासून १० फूटाचे एरोमॉडेल्सने चित्तथराक कसरती सादर केले. विशेष म्हणजे येथे ३० सीसी पासून १५० सीसी पर्यंतचे एरोमॉडेल्सचा सहभाग झाला होता. त्यामध्ये जेट हवाई जहाज पासून कित्येक मॉडेल्सचे हवाई जहाजाचे चित्तथराक कसरती पहावयास मिळाले. हे सर्व हवाई जहाज रेडिओ कंट्रोलच्या माध्यमातून उडविण्यात आले.