'दृश्यम'प्रमाणे प्लॅन केला, चौकशीत गडबडला अन् फसला; पत्नीचा खून करणारा पती अटकेत

By विवेक भुसे | Published: January 15, 2024 03:48 PM2024-01-15T15:48:12+5:302024-01-15T15:49:57+5:30

आपला मोबाईल १५ दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले. महिलेचा शोध घेण्याचा सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते...

Planned as 'Drishyam', but fumbled and blundered in inquiry; Husband arrested for killing his wife | 'दृश्यम'प्रमाणे प्लॅन केला, चौकशीत गडबडला अन् फसला; पत्नीचा खून करणारा पती अटकेत

'दृश्यम'प्रमाणे प्लॅन केला, चौकशीत गडबडला अन् फसला; पत्नीचा खून करणारा पती अटकेत

पुणे : अजय देवगण याचा दृश्यम चित्रपटाप्रमाणे त्याने सर्व काही व्यवस्थित प्लॅन केले होते. अगदी कंपनीत त्या दिवशी उपस्थित असल्याचे रेकॉर्डही मॅनेज केले होते. पत्नीचा शोध घेण्यासाठी तो पोलिसांना मदतही करत होता. तब्बल अडीच महिने त्याने सर्वांना गुंगारा दिला. पण, शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा तो गडबडला अन तेथेच फसला. शेवटी आपण पत्नीला मांढरदेवी च्या घाटात नेऊन दरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पत्नीचा खून करणार्या पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

अमोलसिंग मुरली जाधव (वय २६, रा. फुलगांव, ता. हवेली) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. ललिता अमोलसिंग जाधव (वय ३८) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अमोलसिंग जाधव याने २८ ऑक्टोबर रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिसांकडे नोंदविली होती. तपासासाठी तो स्वत: त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांबरोबर गेला होता. जाधव या मरकळ येथील इंन्प्रो प्रा. लि. कंपनीत कामाला आहे. त्या दिवशी तो दिवसभर कामाला असल्याचे कंपनीतील रेकॉर्डवरुन दिसून आले. त्याने आपला मोबाईल १५ दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले. महिलेचा शोध घेण्याचा सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते.

पोलिसांनी अमोलसिंग याच्याकडे वारंवार चौकशी केली. त्याच्या बोलण्यात थोडी थोडी विसंगती दिसू लागली. त्यामुळे पोलिसांनी ते रहात असलेल्या परिसरात चौकशी केली. त्यातून पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला अन पोलिसांनी तो अमोलसिंग समोर धरला. त्याबरोबर तो गडबडला. अन खुनाची कबुली दिली.

घटस्फोट देत नसल्याने केला खून

अमोलसिंग याची पत्नील ललिता त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. पालकांच्या इच्छेखातर त्याने विवाह केला होता. ती थोडी मंदबुद्धी होता. घटस्फोट देण्यास तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिला संपविण्याचा कट रचला. २८ ऑक्टोबर रोजी त्याने तिला फुलगाव येथील पेट्रोल पंपाजवळ बोलावून घेतले. मांढरदेवीच्या दर्शनाला जायचे असल्याचे सांगून कॅबने मंदिरात पोहचल्यानंतर तो तिला डोंगर उतारावर घेऊन गेला. घाटातून त्याने तिला ढकलून दिले. पण खाली ती झाडा झुडपांमध्ये अडकली. तेव्हा त्याने खाली उतरुन तिच्याच साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो पुन्हा वर आला. कॅबचालकाला ती नातेवाईकांबरोबर गेली असे सांगून तो परत पुण्यात आला.

हाती लागला सांगाडा

लोणीकंद पोलिस ठाण्याचे पथक वाईच्या घाटात गेले. त्यांनी २०० ते २५० फुट खोल दरीत उतरुन शोध घेतला. अडीच महिन्यांपूर्वी मृत्यु झाला असल्याने पोलिसांनी तेथे केवळ सांगाडा, तिची चप्पल, साडी व बांगड्या मिळाल्या. या सांगाड्याचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

सीडीआरमुळे प्रकार उघडकीस

अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने त्याने हा कट रचून खून केला होता. आपला मोबाईल हरविला असल्याचा बहाणा केला. त्या दिवशी कंपनीत दिवसभर उपस्थित असल्याचे गेटवर रेकॉर्डही तयार केले. पोलिसाबरोबर तो शोधाला मदतही करत होता. पण शेवटी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यात त्या दिवशी त्याचा मोबाईल वाई परिसरात असल्याचे दिसून आले. शिवाय ते सीमकार्ड दुसर्या हँडसेटमध्ये टाकून तो वापरत असल्याचे दिसून आले. त्यावरुन संशय वाढला. अन तो जाळ्यात अडकला.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराडे, विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, पोलिस अंमलदार प्रकाश आव्हाळे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे यांनी केली आहे.

Web Title: Planned as 'Drishyam', but fumbled and blundered in inquiry; Husband arrested for killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.