रिंंगरोडमुळे जोडलेल्या गावांचा नियोजनबद्ध विकास : किरण गित्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 08:50 PM2018-04-17T20:50:03+5:302018-04-17T20:50:03+5:30
प्रादेशिक योजनेतील ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याच्या विकासाकरिता औताडे-हांडेवाडी प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक ३, होळकरवाडी प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक ४ व ५ मधील जमीनमालकांसोबत हांडेवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते.
पुणे : औताडे-हांडेवाडी व होळकरवाडी या गावांचा कायापालट नगररचना योजनेच्या माध्यमातून होणार आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पूर्ण टाऊनप्लॅन (टीपी) स्कीम विकसित भूखंड स्वरुपात केली जाणार आहे. गावकऱ्यांच्या माहितीसाठी औताडे-हांडेवाडी व होळकरवाडी दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आराखड्याचे नकाशे लावले आहेत. रिंगरोडच्या माध्यमातून गावे जोडली जाऊन नियोजनबद्ध विकास केला जाणार आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. प्रादेशिक योजनेतील ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याच्या विकासाकरिता औताडे-हांडेवाडी प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक ३, होळकरवाडी प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक ४ व ५ मधील जमीनमालकांसोबत हांडेवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) यासाठी सर्व जमीन मालकांना यासाठी बोलावले होते. याप्रसंगी पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी तथा उपनियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागाचे सुहास मापारी, औताडे-हांडेवाडीच्या सरपंच सुवर्णा गायकवाड, होळकरवाडीच्या सरपंच मंगला झांबरे, माजी उपसरपंच भाऊ झांबरे, चंद्रकांत झांबरे, काका झांबरे, साधना बँकेचे संचालक आबासाहेब कापरे, माजी संचालक प्रवीण तुपे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या अनेक शंकाचे निरसन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी ग्रामस्थांना नगररचनेच्या माध्यमातून सुनियोजित विकास कशाप्रकारे साधला जाईल याविषयी माहिती दिली. या वेळी विजयकुमार गोस्वामी यांनी नगररचना योजना कशा प्रकारे केली जाते. त्याचप्रमाणे नगररचना योजनेमुळे ग्रामस्थांना कशा प्रकारे फायदा होणार आहे याबद्दल माहिती दिली. रहिवाशी झोन बदल विनामुल्य करणार असून यात पीएमआरडीए व जमीनधारकांची भागीदारी आहे. कोणीही भूमिहीन होणार नाही. बांधकाम क्षेत्रात एकरी वाढ ३२ हजार स्केअर फूटएवजी ५३ हजार स्क्वेर फूट केले जाणार आहे. रस्ते, पाणी, वीज, नाले सुविधा १५ महिन्यांत पूर्ण होणार आहे. नवीन प्लॉट नावे करून वाटप देखील १५ महिन्यात होणार आहे. यासाठी जमीन मालकासोबत पीएमआरडीए करार करणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले.