नियोजनात फसली कचराकोंडी
By admin | Published: July 9, 2016 03:59 AM2016-07-09T03:59:32+5:302016-07-09T03:59:32+5:30
शहरात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून शहरात तब्बल तीन हजार
- सुनील राऊत, पुणे
शहरात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून शहरात तब्बल तीन हजार टन कचरा पडून आहे. त्यातच महापालिकेच्या हद्दीजवळील गावांमधूनही रात्रीच्या अंधारात कचरा शहराच्या हद्दीत आणून टाकला जात असल्याने आंबेगाव, नऱ्हे, बावधन, धायरी, कात्रज, कोंढवा तसेच हडपसर परिसरातील भागात कचऱ्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे.
यातच हा कचरा तीन ते चार दिवसांपासून पडून त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेले लिचेट (काळे रासायनिक द्रव) रस्त्यावर येत असून, त्या काळ्या पाण्यातून वाट काढत पुणेकरांना मार्ग शोधावा लागत आहे. तर, पावसाने भिजलेल्या या कचऱ्याचे वजनही चांगलेच वाढले असल्याने ओला व सुका कचरा वेगळा करण्यात अडचणी येत आहेत.
तीन हजार टन
कचरा पडून
शहरात आठवडाभरापासून तब्बल तीन हजार टन कचरा पडून आहे. शहरात दरदिवशी सुमारे १,७०० टन कचऱ्याची निर्मिती होते. त्यातील केवळ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तर उर्वरित सुमारे ७०० टन कचरा तसाच पडून आहे. त्यातच पावसामुळे या कचऱ्याचे वजन वाढले असून, भिजलेला हा कचरा उचलणेही अवघड झाले आहे.
महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यापैकी २५० टन रोकेम प्रकल्पात, ५०० टन कचऱ्याचे कॅपिंग, १०० टन कचऱ्यावर नोबोल प्रकल्पात, तर २०० टन कचऱ्यावर दिशा आणि अजिंक्य प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे.
८० ते ९० गाड्या बंद
महापालिकेच्या व्हेईकल विभागाकडे शहरातील कचरा उचलण्यासाठी सुमारे ४०० गाड्या आहेत. मात्र, चालकांची संख्या कमी असणे, गाड्यांची देखभाल-दुरुस्ती न होणे, गाड्यांचे आयुर्मान संपल्याने गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून दररोज तब्ब्बल ८० ते ९० गाड्या ब्रेकडाऊनच्या नावाखाली बंद असतात. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या मागणीनुसार कचरा उचलण्यासाठी बीआरसी मिळत नसल्याची क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तक्रार आहे. तर, अनेक वर्षांपासून नवीन गाड्यांची खरेदीच झालेली नसल्याने अनेक आयुर्मान संपलेल्या गाड्या वाहतुकीच्या वेळी बंद पडण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
पाच क्षेत्रीय कार्यालयांत कचऱ्याची गंभीर स्थिती
शहरातील पाच प्रमुख क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कचऱ्याची स्थिती गंभीर बनली आहे. त्यात टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय, कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय तसेच ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय यांच्या काही भागाचा समावेश आहे.
या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये चार दिवसांपासून कचराच उचलण्यात आला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहत असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर आलेल्या कचऱ्यामुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
कचरा उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या गाड्या व्हेईकल डेपोकडून मिळत नसल्याने कचरा उचलण्यात अडथळा येत असल्याच्या तक्रारीही काही क्षेत्रीय कार्यालयांनी थेट महापालिका आयुक्तांंकडे केलेल्या आहेत.
झाडणकामही बंदच.. : पावसामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दररोज सकाळी करण्यात येणारे शहरातील बहुतांश ठिकाणचे झाडणकामही बंद करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी पावसामुळे गैरहजर असल्याने तसेच पाऊस पडल्याने ओला झालेला कचरा झाडताच येत नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. हा कचरा सुकल्याशिवाय उचलणे शक्य नसल्याने कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
पावसामुळे शहरातील कचरा उचलण्यात अडचणी येत आहेत; मात्र पाऊस थांबताच तातडीने हे काम हाती घेण्यात येईल. याशिवाय, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ब्रेकडाऊनचे प्रमाण थोडे वाढले असले, तरी तातडीने या गाड्यांवर चालक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कचरा पडून आहे; मात्र त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून तातडीने कचरा उचलला जाईल.
- सुरेश जगताप (घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख )