विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी १५१ बस, वाहतूककोंडी टाळण्यासाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:40 AM2018-12-22T01:40:59+5:302018-12-22T01:41:17+5:30
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला येत्या १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला येत्या १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पुणे व शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ बस सोडल्या जाणार आहेत. तसेच, वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील ३० किलोमीटरपर्यंतची वाहतूक वळविली जाणार आहे.
गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा, या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. तसेच, विविध विभागांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांंच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ७ ते १० लाख नागरिक येतील, असे गृहीत धरून जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षेसह आवश्यक सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत दिली. त्यामुळे पुण्यातून कोरेगाव भीमा येथे जाणाºया आणि नगर रस्त्याने येणाºया नागरिकांसाठी शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांतील काही बस शटल म्हणून वापरल्या जातील.
तसेच, खासगी वाहनांसाठी ११ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पीएमपी बससाठी पेरणे ग्रामपंचायतीने एक एकर जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे. शिरूर तालुक्यात ५ आणि हवेली तालुक्यात ६ ठिकाणी नागरिकांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली असून, तेथे एक हजारांहून अधिक चारचाकी वाहने मावू शकतात.
राज्य शासनाने : दोन कोटी रूपये देण्याचे मान्य केले
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाला शासनाकडून २ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. निधीची कमतरता भासली तर जिल्हा नियोजन समितीतून तो दिला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले. तसेच, विजयस्तंभाजवळ कायमस्वरूपी पाण्याची टाकी, हॉल आवश्यक बैठकव्यवस्था असावी या संदर्भातील प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही बापट यांनी सांगितले.
गेल्या २ महिन्यांपासून पेरणे फाटा, सणसवाडी, वढू, वाघोली, कोरेगाव भीमा या भागांतील विविध संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांशी संपर्क साधून बैठकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात आला आहे. स्वच्छता, १०० पिण्याचे टँकर, ३६० फिरती शौचालये, विजयस्तंभ परिसराचे सुशोभीकरण,
रस्तेदुरुस्ती, वाहतूक, खाद्यपदार्थांची
दुकाने, वाहनतळ, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा आदींबाबत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी
सांगितले.
पोलीस प्रशासनाने मागील वर्षी झालेली दंगल लक्षात घेऊन गेल्या वर्षापेक्षा दहा पटींनी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. त्यानुसार, ५ हजार पोलीस, १२ हजार होमगार्ड, एसआरपीएफच्या १२ तुकड्या आणि ४०० स्वयंसेवक यांच्या मदतीने कायदा-सुव्यवस्था राखली जाणार आहे.
विजयस्तंभाजवळील सभांसाठी काही अटी
विजयस्तंभाजवळ सभा घेण्यास शासनाचा किंवा जिल्हा प्रशासनाचा विरोध नाही. परंतु, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाºया नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने विजयस्तंभापासून काही मीटर अंतरावर सभा घेण्यास परवानगी दिली जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत नमूद केले.
मात्र, या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध
दर्शविला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर यातून
मार्ग काढण्याचे आव्हान असेल.