दौंड तालुक्याला नियोजन मंडळाचा ४१ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:05+5:302021-08-19T04:15:05+5:30
उपमुख्यमंत्री, तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दौंड तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या ...
उपमुख्यमंत्री, तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दौंड तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या बहुतांश प्रस्तावांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
दौंड तालुक्यातील विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे- जनसुविधांतर्गत रस्ते व बंदिस्त गटर करण्याकरिता दौंड तालुक्यासाठी जवळपास १३ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नागरीसुविधा योजनेअंतर्गत गावातील सिमेंट रस्ते, सार्वजनिक ठिकाणी दिवा लावणे, भूमिगत गटर बांधणे, पूल बांधणे इत्यादी कामांसाठी ४ कोटी ८७ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले असून
शिक्षण विभागाच्या वतीने दौंड तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्गखोल्या बांधणे याचबरोबरीने शाळा दुरुस्ती करणे या विकासकामांकरिता १ कोटी १० लाख मंजूर करण्यात आलेले आहेत.
छोटे पाटबंधारे विभागाच्या ० ते १०० हेक्टर पर्यंतच्या लघू पाटबंधारे योजना अंतर्गत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, वळण बंधारा दुरुस्तीसाठी १ कोटी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. नवीन अंगणवाडी बांधणेकामी ९३ लाख रुपये मंजूर झाले आहे. दौंड शहरातील विविध रस्त्यांसाठी तसेच विविध विकासकामांकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधारणा व सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गंत १६ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निधीचा योग्य वापर करून विकास कामाचा दर्जा राखण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन रमेश थोरात व वीरधवल जगदाळे यांनी केले.