शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्राचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:16+5:302021-05-05T04:19:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सध्या लस उपलब्ध नसली, तरी लस उपलब्ध झाल्यावर अधिकाधिक नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार लवकरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सध्या लस उपलब्ध नसली, तरी लस उपलब्ध झाल्यावर अधिकाधिक नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार लवकरात लवकर लस देता यावी, याकरिता पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या मदतीने शहरात मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्र उभारणी करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे़
मतदान केंद्रनिहाय लसीकरण केंद्राची रचना करता, एका मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे एक हजार मतदान होते, त्यानुसार लसीकरण केंद्र उभारून तीन-चार दिवसांत तेथील लसीकरण पूर्ण करता येईल का, याचे नियोजन स्मार्ट सिटीला करण्यास महापालिकेने सांगितले आहे़
शहरात महापालिकेच्या वतीने सध्या ११४ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत़ परंतु, काही प्रभागात अधिक, तर काही ठिकाणी कमी, अशा पध्दतीने ती कार्यान्वित आहेत़ त्यामुळे प्रारंभी या सर्व लसीकरण केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार असून, प्रत्येक प्रभागात दोनच लसीकरण केंद्र दिली जाणार आहेत़ तसेच, जस-जसा लसीचा पुरवठा वाढेल, तशी या केंद्रात वाढ करण्यात येणार असून, प्रभागातील प्रत्येक गटात म्हणजे अ, ब, क, ड निहाय केंद्र उभारणी करण्यात येणार आहे़, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली़
---------------------