योजना कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:27+5:302021-09-24T04:12:27+5:30
पुणे- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांवर काम करणाऱ्या देशभरातील काही लाख कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २४) काम बंद आंदोलन ...
पुणे- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांवर काम करणाऱ्या देशभरातील काही लाख कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २४) काम बंद आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या एकाही योजनेवरील एकही कर्मचारी उद्या दिवसभरात त्या योजनेचे काहीही काम करणार नाही.
अत्यल्प मानधन, नोकरीची हमी नाही, कामाचे तास निश्चित नाहीत, वरिष्ठांची मनमानी, कामासाठी लागणाऱ्या साहित्याचे नियमित वाटप नाही, कामाशिवायच्या अन्य अनेक कामांची जबाबदारी अशा विविध अन्यायाने ग्रस्त असलेल्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्या करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ सुद्धा नाही. त्यामुळेच इंटक तसेच देशस्तरावर काम करणाऱ्या केंद्रीय कामगार संघटनांनी संयुक्त व्यासपीठ तयार करून या कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे काम बंद आंदोलन जाहीर केेले आहे.
या व्यासपीठाचे पुण्यातील पदाधिकारी नितीन पवार यांनी ही माहिती दिली. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता सर्व योजना कर्मचारी निदर्शने करणार आहेत. सगळीकडे याच पद्धतीने कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून ही निदर्शने होतील. त्यानंतर याबाबत केंद्रीय स्तरावर सरकारबरोबर बोलणी होतील, असे पवार यांनी सांगितले.