गळीत हंगामाचे नियोजन आतापासूनच करावे; शरद पवार यांची साखर कारखान्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:52 AM2017-12-26T11:52:21+5:302017-12-26T11:55:26+5:30
साखरेचा पुढील गळीत हंगाम विक्रमी ऊस लागवडीमुळे अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. पुढील गळीत हंगामाचा कार्यक्रम आत्तापासून कारखान्यांनी आखावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली.
पुणे : साखरेचा पुढील गळीत हंगाम विक्रमी ऊस लागवडीमुळे अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. पुढील गळीत हंगामाचा कार्यक्रम आत्तापासून कारखान्यांनी आखावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी देशात आणि राज्यात विक्रमी क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे, त्यामुळे पुढील हंगामाचे आत्तापासून नियोजन करावे लागेल. अगदी ज्या कारखाना क्षेत्रात ऊस कमी असेल त्यांनी अधिक ऊस असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांशी करार केले पाहिजेत. आपल्या देशात थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार होत नाही, ती पद्धत आपल्याकडे तितकीशी अनुकूल देखील नाही, त्यामुळे मोलासीस साठवून ठेवण्याची तजवीज करावी, अशा उपाय योजना केल्या नाही तर ऊस हंगाम जूनपर्यंत लांबून साखर उतारा कमी मिळेल. परिणामी ऊस उत्पादकांना तितकी रक्कम कारखान्यांना देता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले
या वर्षी देशात विक्रमी ऊस उत्पादन झाले आहे, त्यामुळे पुढील हंगामात विक्रमी गळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.