नियोजन करून ग्रामस्थांनी समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग नोंदवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:03+5:302021-02-06T04:17:03+5:30
डॉ. राजेश देशमुख : गावांच्या प्रस्तावित नियोजनाबाबत आढावा बैठक बारामती: तालुक्यातील एकूण २२ गावांनी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये ...
डॉ. राजेश देशमुख : गावांच्या प्रस्तावित नियोजनाबाबत आढावा बैठक
बारामती: तालुक्यातील एकूण २२ गावांनी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. लोकसहभागातून काही गावात खूप चांगले काम झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवर नियोजन करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी गावांच्या प्रस्तावित नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, विभागीय समन्वयक आबा लाड, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ,पाणी फाउंडेशनचे नामदेवराव ननावरे, पृथ्वीराज लाड, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, पाणी फाउंडेशनचे काम करत असताना बहुतंशी ठिकाणी चांगली कामे झाली आहेत. ग्रामस्थांच्या चांगल्या सहभागामुळे काही ठिकाणी गावे टँकरमुक्त झाली आहेत, ही एक चांगली बाब आहे. शासकीय योजनांना लोकसमुहाची जोड मिळाली तर खूप चांगले काम होऊ शकते. बारामती तालुक्यातील २२ गावांपैकी ५ गांवानी स्पर्धेचे निकष पूर्ण केले आहेत. बाकीच्या गावांनीही स्पर्धेचे निकष पूर्ण करून त्यात सहभागी व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. बारामती तालुक्यात पाणी फाउंडेशनचा प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे. असाच समन्वय टिकवून ठेवून चांगल्या प्रकारे कामे करा, असेही त्यांनी सांगितले.
पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक अविनाश पोळ म्हणाले की, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा ४५ दिवसांची होती यात प्रथम तीन तालुके सहभागी झाले होते. यासाठी ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावाला एक करून कामे करून घेणे व गावाचा विकास करणे हीच पाणी फाउंडेशनची मुख्य भूमिका आहे.
बैठकीचे प्रस्ताविक पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक आबा लाड यांनी केले. ग्रामसेवक दीपाली हिरवे आणि कृषी सहायक प्रवीण माने यांनी पाणी फाउंडेशनच्या देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा अनुभव सांगितला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वनपरीक्षक अधिकारी राहुल काळे यांनी मनोगत व्यक्त केली.