नियोजनाने मिळेल परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:02+5:302021-04-01T04:10:02+5:30
अभ्यास व सरावाला सुरुवात केली तरीसुद्धा आपण चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकतो. सध्या शिक्षकांबरोबर पालक आणि विद्यार्थीसुद्धा स्मार्ट ...
अभ्यास व सरावाला सुरुवात केली तरीसुद्धा आपण चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकतो. सध्या शिक्षकांबरोबर पालक आणि विद्यार्थीसुद्धा स्मार्ट झाले आहेत. अभ्यासक्रमसुद्धा स्मार्ट आहे. त्यामुळे अभ्याससुद्धा स्मार्ट करा आणि येणाऱ्या परीक्षेत चांगले यश मिळवा. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटले आहे. रोज नवीन अफवा पसरत आहेत. तर खोट्या अफवांवर पटकन विश्वास न ठेवता, त्यातील सत्य काय आहे ते जाणून घ्या. परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होणार आहे, हे खरं आहे. परीक्षा ऑनलाईन होणार या अफवेवर विश्वास ठेवू नका.
अशी करा परीक्षेची पूर्वतयारी...
कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद होत्या परिणामी विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण येऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक विषयाचा २५% अभ्यासक्रम कमी केला आहे. प्रत्येक विषयाचा नेमका कोणता घटक वगळलेला आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविण्याचा सराव करा. प्रत्येक विषयाच्या किमान पाच तरी प्रश्नपत्रिका सोडवा. सराव करत रहा. सरावाने आपणास परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास येईल. परीक्षेची भीती दूर होऊन नक्की यशस्वी व्हाल.
अफवांवर ठेवू नका विश्वास...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी अभ्यास व सरावात सातत्य ठेवावे.
असे करा परीक्षेचे नियोजन...
दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करा. आपल्या हातात उरलेले दिवस उपयोगात आणा. आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक आपणच तयार करा. कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे ते ठरवा. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल हे पहा. मनावर कुठलाही ताण तणाव घेऊ नका. परीक्षेची भीती बाळगू नका. बोर्डाची ही परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नाही. पालकांनीसुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे. विनाकारण आपल्या पाल्याला तणाव येईल, असे वातावरण घरात निर्माण करू नका. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. आपल्या पाल्याच्या यशात आपला आनंद आहे, हे लक्षात ठेवा. आज पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळेल.
- सुधाताई सुळे-अजबे, शिक्षिका व समुपदेशक