दौंड येथे पोतदार स्कूलमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:08+5:302021-09-09T04:14:08+5:30
दौंड : येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शाळा प्रशासनाने कोविडच्या नियमांचे पालन करत शिक्षक दिनानिमित्ताने ...
दौंड : येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शाळा प्रशासनाने कोविडच्या नियमांचे पालन करत शिक्षक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम घेतले. प्राचार्य विशाल जाधव, पोदार एज्युकेशन नेटवर्क, पुणेचे वरिष्ठ व्यवस्थापक बिपीन महाजन, मनोहर बोडखे यांच्या हस्ते सरस्वती, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचा शुभेच्छाकार्ड व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. शिक्षकदिन व राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा शिक्षकांनी घेतला. प्रशालेचे संगीत शिक्षक संजय मोरे यांनी ही गुरूंची महती आपल्या सुमधूर गीतांमधून सादर करून गुरूंना मानवंदना दिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनीदेखील ऑनलाईन स्वरूपात प्रशालेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोहर बोडखे यांनी सर्व शिक्षकांसाठी ‘हास्यतडका’ या कार्यक्रमांतर्गत मनमुराद हास्याची अनुभूती दिली. यावेळी बिपीन महाजन म्हणाले की, आपले पहिले गुरू आई- वडील, शिक्षक आहेत आणि या गुरुंमुळेच आपले जीवन सफल होत असते. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी नेहमी चांगले विचार बाळगावेत व नेहमी प्रयत्नवादी राहून येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हावे. प्राचार्य विशाल जाधव म्हणाले की, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व खूप असते आणि गुरूच खऱ्या अर्थाने जीवनाच्या मार्गात दिशा दाखवू शकतात.
या कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले होते. सूत्रसंचालन योगेश राऊत यांनी केले तर विवेक पिसाळ यांनी आभार मानले.
दौंड येथे पोतदार स्कूलमध्ये मान्यवरांनी वृक्षारोपण केले.