आळंदी म्हातोबा येथे अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:34+5:302021-05-04T04:04:34+5:30

आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिविसर्जन न करता मयत व्यक्तीच्या स्मरणार्थ एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा उपक्रम आळंदी म्हातोबा ...

Plantation without osteoporosis at Alandi Mhatoba | आळंदी म्हातोबा येथे अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण

आळंदी म्हातोबा येथे अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण

googlenewsNext

आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिविसर्जन न करता मयत व्यक्तीच्या स्मरणार्थ एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा उपक्रम आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील वृक्षारोपण संवर्धन समितीच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.

आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस पाटील सोनाली सचिन शिवरकर यांचे पती सचिन विठ्ठल शिवरकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून अस्थी विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी एक खड्डा घेऊन त्यात विसर्जित कराव्यात, अशी इच्छा बंधू सागर व प्रकाश शिवरकर यांनी व्यक्त केली. वृक्षारोपण संवर्धन समितीच्या पुढाकाराने वैकुंठधाम, पानमळा येथे एक चिंचेचे झाड लावून तेथे अस्थिविसर्जन करण्यात आले.

वृक्षारोपण संवर्धन समितीच्या माध्यमातून जल प्रदूषण रोखण्यासाठी माणसाच्या निधनानंतर रक्षा (अस्थी) नदीत विसर्जित न करता त्या खोल खड्डा घेऊन त्यात एक वृक्ष लावावा, असा उपक्रम तीन वर्षांपासून आळंदी म्हातोबाची गावात राबविण्यात येत आहे. पाण्यात अस्थी विसर्जन करून पाणी दूषित होते व आपल्या गेलेल्या व्यक्तीची आठवण आपणास राहत नाही. त्यामुळे समितीच्या वतीने वृक्ष लावून त्यात अस्थी विसर्जित करून ती मयत व्यक्ती आपणास सदैव आठवणीत राहावी आणि त्या वृक्षापासून पर्यावरणाचे व नदीचे प्रदूषण थांबावे हाच हेतू आहे.

अस्थिविसर्जन - दहनानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रक्षा (अस्थी) विसर्जनाचा कार्यक्रम असतो. लाकूड वापरून अंत्यसंस्कार केल्यामुळे जवळपास २०-३० किलो रक्षा तयार होते. ही संपूर्ण रक्षा जवळच्या ओढ्यात किंवा नदीत विसर्जित करतात. त्याऐवजी अशा प्रकारे वृक्षारोपण केल्यास आपल्या प्रिय व्यक्तीला झाडाच्या रूपात परत पाहायला मिळू शकेल. या उपक्रमामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. प्रत्येक व्यक्तीने वृक्षामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण व आप्तेष्टांना पाहिले तर वृक्षांची संख्या वाढेल. यातून जनतेला खूप मोठा फायदा मिळू शकतो. निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबला जाईल.

या वेळी आळंदी म्हातोबाच्या पोलीस पाटील सोनाली सचिन शिवरकर, त्यांचे आई-वडील व भाऊ सागर शिवरकर, प्रकाश शिवरकर, उपसरपंच तेजस शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य विनायक जवळकर, वृक्षारोपण संवर्धन समिती व ग्राहक पंचायत हवेली तालुक्याचे अध्यक्ष संदिप शिवरकर, सदस्य महेश शिवरकर, बापुसाहेब जवळकर, दिगंबर शिवरकर , काळुराम शिवरकर, गणेश शिवरकर, रघुनाथ शिवरकर, डॉ. रायकर, साहेबराव जवळकर, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Plantation without osteoporosis at Alandi Mhatoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.