रोटरी करणार २ लाख वृक्षांचे रोपण
By admin | Published: June 30, 2016 01:16 AM2016-06-30T01:16:07+5:302016-06-30T01:16:07+5:30
येत्या १ जुलै रोजी आयोजित ‘हरित महाराष्ट्रा’साठीच्या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : राज्याच्या वन विभागाच्या वतीने येत्या १ जुलै रोजी आयोजित ‘हरित महाराष्ट्रा’साठीच्या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रो. पिनल वानखेडे, रो. देवव्रत शहाणे, रो. सुधांशू गोरे, रो. आनंद खैरनार, रो. मकरंद टिल्लू, रो. अजय वाघ या रोटेरियननी पुढाकार घेतला आहे. रोटरीच्या वतीने पुणे जिल्ह्यात सुमारे २ लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक जीत सिंग यांच्या प्रेरणेतून ही योजना साकार होत आहे.
रोटरीचे पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये एकूण १२४ क्लब आहेत. गेली अनेक वर्षे क्लब वैयक्तिक पातळीवर वृक्षारोपण करीत आहे. यामुळे दर वर्षी काही हजार झाडे लावली जातात. मात्र, आता या सर्व क्लबनी एकत्र येऊन एकाच दिवशी, एकाच वेळी जिल्ह्यामध्ये सगळीकडे झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. यासाठी, त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला होता. वन विभागाने रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ ला राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी १ जुलै रोजी आमंत्रित केले आहे.
दरम्यान, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख आणि कॉलेज आॅफ प्रेसिडंटचे संयोजक आनंद खैरनार यांच्याशी या कार्यक्रमाविषयी चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाची रूपरेषा निश्चित केली.
दि. १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपणासाठी वन विभाग सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करणार आहे. रोटरी क्लब या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक उपलब्ध करून देणार आहे. रोटरीने स्वयंसेवकांची आॅनलाईन नोंदणी सुरू केली असून, अधिकाधिक नागरिकांना यामध्ये सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)
>सामाजिक कार्याला हातभार
रोटरीचे सर्व १२४ क्लब या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असून, प्रत्येक क्लब किमान १०० स्वयंसेवकांची नोंदणी करीत आहे. हे स्वयंसेवक स्वखर्चाने वृक्षारोपणाच्या ठिकाणी जाऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार, वृक्षारोपण करणार आहेत. प्रत्येक व्यक्ती सुुमारे २५ ते ४० वृक्षांचे रोपण करेल, अशी माहितीही त्यांनी दिली. या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सहभागामुळे एका मोठ्या सामाजिक कार्याला हातभार लागेल आणि महाराष्ट्र हरित होण्यास मदत होईल, अशी भावनाही या वेळी रोटेरियननी व्यक्त केली.