आईच्या अस्थी विसर्जन न करता शेतातच ठेवून केले वृक्षारोपण; जुन्नर तालुक्यातील आदर्श उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:28 PM2020-06-20T12:28:37+5:302020-06-20T12:31:09+5:30
आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प..
पुणे : मृत्यू झाल्यानंतर नदीत अस्थिविसर्जन केले जाते. परंतु एका कुटुंबाने नदीत अस्थिविसर्जन न करता स्वत:च्या शेतातच जमिनीत ठेवून त्यावर वृक्षारोपण केले आहे. आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प या कुटुंबाने केला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी या गावातील थोरात कुटुंबाने हा उपक्रम राबविला आहे.
सध्या कोरोनाने पालखी पायी सोहळा रद्द झाला आहे. उलट घरोघरी रोप लावून यंदाची वारी हरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन थोरात कुटुंबीयांनी अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. नकुबाई वामनराव थोरात यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील नंदाशेठ, विजय या मुलांनी आणि शोभा सविता थोरात या सूनांनी नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला.
पालखी सोहळ्यात पर्यावरण वारीची परंपरा सुरू करणारे ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी यंदा गुळवेल लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार आईच्या स्मरणार्थ आंब्याचे झाड लावले असून, गुळवेल, पिंपळ, पेरू, जांभळी, लिंबू, सीताफळ ही रोपं देखील लावली आहेत. ही सर्व झाडं औषधी आहेत. झाड लावताना निसर्ग संरक्षणाचा पाठ वाबळे महाराज यांनी म्हटला.
=====================
निसर्गपाठ बोलून वृक्षारोपण
''रूप पाहता लोचनी, पर्यावरण ठेवू मनी
त्वा विठ्ठल बरवा, झाडे लावा झाडे जगवा
बहुत सुकृताची जोडी, धरा सेंद्रीय खताची आवडी
सर्व सुखाचे आगर, बनवू आमराई सुंदर !''
हा निसर्गपाठ या प्रसंगी म्हणण्यात आला आणि वृक्षारोपण करण्यात आले.
===============
स्मृती जपण्यासाठी उपक्रम
नदीत अस्थिविसर्जन केल्यानंतर प्रदूषण होते. पण या उपक्रमाने एक चांगला आदर्श लोकांसमोर ठेवण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करणे मनाला दिलासा देणारे आहे. कारण रोप जसे वाढेल तसे त्या सळसळणाºया पानांतून ती व्यक्तीच आपल्याशी संवाद साधतेय अशी भावना मनी येईल. हा आनंद अविस्मरणीय ठरेल. पिढ्यान पिढ्या हा वृक्ष त्या व्यक्तीची आठवण म्हणून बहरत जाईल. ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रबोधनकार ज्ञानेश्वरमहाराज वाबळे यांनी सांगितले.
==============