शहरात निम्म्याच रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 04:00 AM2020-11-27T04:00:08+5:302020-11-27T04:00:08+5:30
पुणे : पुणे शहरामध्ये १५ रक्तपेढ्या असून त्यापैैकी केवळ ५-६ रक्तपेढ्यांमध्येच सध्या काही प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध आहे. जुलै ते ...
पुणे : पुणे शहरामध्ये १५ रक्तपेढ्या असून त्यापैैकी केवळ ५-६ रक्तपेढ्यांमध्येच सध्या काही प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात प्लाझ्माचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दुसऱ्या लाटेमध्ये ही परिस्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी प्लाझ्मादानासाठी दात्यांनी आपणहून पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.
प्लाज्मा थेरपीबाबत विविध स्तरांवर अभ्यास सुरू आहे. कोव्हिड-१९ विरोधात कुठलीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीकडे आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. मध्यम स्वरूपाच्या गंभीर रुग्णांमध्ये या थेरपीचा वापर होत आहे. रुग्णसंख्या कमी झालेली असतानाही प्लाझ्माचा तुटवडा ही चिंतेची बाब ठरत आहे. पुण्यात आजही सरासरी १८-२० जण कोरोनाने मृत्युमुखी पडत आहेत. भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती व्हायला हवी, असे मत नोंदवले जात आहे.
काही वेळा दात्यांची नोंदणी होते, मात्र फोन केल्यावर ते प्लाझ्मा दानासाठी येतीलच याची शाश्वती नसते. बरेचदा प्लाझ्मा देण्याबाबत टाळाटाळ केली जाते. एखाद्या रुग्णाला तातडीची गरज असेल तर प्रिझर्व्ह करून ठेवलेला प्लाझ्मा दिला जातो आणि यादी पुन्हा तयार केली जाते, असे रक्तपेढी चालकांनी सांगितले.
--
कोण देऊ शकतो प्लाझ्मा?
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारानंतर बरी झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा देऊ शकतो. त्यांची हिमोग्लोबीनची पातळी चांगली असावी लागते. प्लाझ्मा दान करण्यासाठी अॅन्टीबॉडी टेस्ट केली जाते आणि प्लाझ्मा संकलित करण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो.
---
सध्या पुणे शहरामध्ये १५ रक्तपेढ्या कार्यरत आहेत.
रक्तपेढी उपलब्ध प्लाझ्मा साठा (२०० एमएल)
ससून ७९
जनकल्याण रक्तपेढी २९
पुना हॉस्पिटल ११
सह्याद्री हॉस्पिटल ९
रुबी हॉल क्लिनिक ४
---
सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने सध्या प्लाझ्मा उपलब्ध आहे. मात्र, कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता गृहित धरुन दात्यांनी प्लाझ्मादानासाठी आपणहून पुढे यावे, यासाठी आम्ही संपर्क साधत आहोत. एबी पॉझिटिव्ह हा जागतिक प्लाझ्मा दाता गट असल्याने त्याची सातत्याने कमतरता जाणवते.
- डॉ. सोनाली मराठे, पुना हॉस्पिटल ब्लड बँक
--
एकूण कोरोना रुग्ण : १,६७,६०४
सध्या उपचार घेत असलेले (सक्रिय) - ५११०
उपचारानंतर बरे झालेले - १,५८,०५४
एकूण मृत्यू - ४४४०