पुणे महानगरपालिकेत प्लाझ्मा सेल सुरू करावे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची महापालिका आयुक्तांना विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:32 PM2021-04-22T17:32:15+5:302021-04-22T17:56:59+5:30
आयुक्तांचा मागणीला सकारात्मक प्रतिसाद
पुणे: शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच प्लाझ्माची गरज भासणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. दुर्देवाने प्लाझ्मादान करण्याबाबत उदासीनता आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने प्लाझ्मा सेल सुरु करावे. अशी विनंती करून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांना आज निवेदन दिले आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी मनाली भिलारे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक भय्यासाहेब जाधव, प्रदेश सरचिटणीस स्नेहल शिनगारे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गितांजली सारगे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सोनाली गाडे, शिवानी माळवदकर, विणा कात्रे, ऋृतुजा शिर्के आदि उपस्थित होते.
महापालिकेकडे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे या सेलमधून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मादानासाठी तयार करता येऊ शकते. त्यासाठी महापालिकेला फारसा खर्च येणार नाही. अन मनु्ष्यबळही फारसे लागणार नाही. काही स्वयंसेवी संस्थाही महापालिकेला त्यासाठी मदत करू शकतील. महापालिकेने अंमलबजावणी केली तर शहरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळू शकतो असे निवेदनात नमूद केले आहे. आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत त्वरीत अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे आश्वासन दिले.